पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी ईडीने कारवाई करत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर, प्रविण राऊत यांची पालघर, अलिबाग आणि दादर येथील एक सदनिका जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, जर एक जरी बेनामी मालमत्ता निघाली तर सर्व मालमत्ता भिकारी भाजपाला दान करेन असा खोचक टोला लगावत राजकारण सोडेन असा इशाराही दिला.
जप्त केलेली संपत्ती ही कष्टाने जमाविलेली संपत्ती आहे. त्यातील एक रूपयांची संपत्ती अवैध मार्गाने, चुकीच्या मार्गाने कमावलेली आढळून आली तर ती सर्व संपत्ती भिकारी भाजपाला दान केरेन. तसेही ते भिकारीच असल्याचा खोचक टोला त्यांनी लागवला.
त्याचबरोबर जर आरोप सिध्द झाले तर राजकारण सोडेन, पण सुडाच्या कारवायांना आपण घाबरणार नसून मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेला माणूस असून माझ्या धमण्यांमध्ये शिवसेना असल्याचे सांगत आपण या कारवायांना घाबरत नसल्याचे सांगितले.
मागील वेळी माझ्यावर ५५ लाखांचे कर्ज होते. ते कर्ज मी परत जमा केले आहे. तशी माहितीही शपथपत्रात मी मनूद केली आहे. पण माझ्यावर आणि राज्यातील इतर मंत्र्यावर कारवाई करून त्यांनी स्वतःची कबर खोदायला सुरुवात केली असल्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
मला माहित होते की माझ्या मागे ईडी सलागलेली आहे. केवळ मी राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी ही कारवाई सुरु करण्यात आली होती. तसेच माझ्यावर दबावही टाकण्यात आला होता. डोक्याला बंदूक लावली तरी ईडीच्या कारवायांना आपण घाबरणार नाही. पण अशा कारवायांमुळे संजय राऊत तुमच्यापुढे गुढघे टेकेल असे वाटत असेल तर ते कदापी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईत सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांची मालमत्ता, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची मालमत्ता आणि प्रविण राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली.
दरम्यान या कारवाईनंतर संजय राऊत यांनी असत्यमेव जयते आणि लोकशाहीचा खून झाला असे दोन ट्विट करत आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली.
