Breaking News

सिंधुदूर्ग बँकेच्या संचालक निवडीनंतर नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेचे भाष्य शिवसेनेत आता वाघ होत नाही तर मांजरीही असतात

मराठी ई-बातम्या टीम

बँक अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराच्या कालावधीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी तुरुंगावास भोगावा लागल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांची आज सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या स्विकृत संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर कुडाळचे प्रकाश मोरे यांचीही निवड करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत शिवसेनेत आता वाघ होत नाहीत मांजरीही असतात असा उपरोधिक टोला राणे यांनी संजय राऊत यांना लगावला.

संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत घाम पुसतानाचा व्हिडीओ शेअर केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, घाबरलेला माणूस कसा दिसतो आणि कितीही आव दाखवत असले तरी घाम पुसत असताना चेहऱ्याचे हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजेत. शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येकजण वाघ होत नाही. आजूबाजूला मांजरी पण असतात. जनतेला मांजर दिसावी म्हणून तो व्हिडीओ टाकला.

मुंबईतील बंगल्याला देण्यात आलेल्या नोटीशीवर बोलताना ते म्हणाले की, नोटीस पाठवली आहे तर कायदेशीर गोष्टीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार. प्रसारमाध्यमांसमोर उत्तर देणं चौकटीत बसत नसल्याचे स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. आज जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.

दरम्यान नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तज्ञ स्विकृत संचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी येत्या काळात जिल्हा बँक राणे समर्थकांचा अड्डा बनू नये अशी अपेक्षा व्यक्त करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा व यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालकपदी निवड केली जाते. मात्र आज जिल्हा बँकेच्या बैठकीत झालेल्या स्वीकृत संचालक या निवडीकरिता तज्ज्ञ स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवत सत्ताधारी संचालक पॅनलकडून आमदार नितेश राणे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले. आमदार नितेश राणे हे बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना जिल्हा बॅंक निवडणुकीत मतदानाचा देखील अधिकार नव्हता. थकबाकीदार असलेल्या व मतदानाचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत संचालक बनवणे हे बँकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी राणे समर्थक प्रणित पॅनलला बहुमत मिळाले, तरी निवडीनंतर जिल्हा बँकेत राजकारण असू नये हे आमचे मत आहे. मात्र ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. ती पाहता येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे समर्थकांच्या राजकारणाचा अड्डा बनवू नये अशी अपेक्षा असल्याचा टोलाही त्यांनी लगावाला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *