Breaking News

पीएमसी बँक खातेदारांची भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने बँकप्रकरणी आरबीआयशी बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँक खातेदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला असून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर या खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खातेदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी रिझर्व्ह बँकेशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या घोषणेमुळे यापरिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
महाराष्ट्र अॅण्ड पंजाब मल्टीस्टेट बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्यामुळे बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेने निर्बध घातले. त्यामुळे अनेक खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्याचे निमित्त साधत भाजपा प्रदेश कार्यालयालासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली.
त्यानंतर सीतारामन यांनी खातेदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेत आरबीआयशी बोलण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना त्या पुढे म्हणाल्या की,
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत मिळण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रयत्न करत आहे. याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. या संदर्भात आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांच्याशी आज पुन्हा चर्चा करणार आहोत. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी काय करता येईल यासाठी केंद्रीय अर्थ आणि बँकिंग खात्याचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर यांची समिती नियुक्त करण्यात येईल. सहकारी बँकांत असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी ही समिती उपाययोजना सुचवेल. संसदेच्या आगामी अधिवेशनात संबंधित कायद्यात बदलही करू.
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला कार्यक्षम आणि विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकारने प्रत्येक समाज घटकासाठी योजना आखल्या. जलयुक्त शिवार सारख्या योजनेमुळे शेतीला शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी फडणवीस सरकारने निर्धाराने पावले टाकली आहेत. फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुंबईत आणि महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या पाच वर्षांत हिंसाचाराची एकही घटना घडलेली नाही. लातूर सारख्या शहराला रेल्वेतून पिण्याचे पाणी पुरविण्याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांनीच प्रत्यक्षात आणली. यामुळेच मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवून भाजप शिवसेना महायुती पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *