Breaking News

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा खा. डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी

दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजपा नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार पत्र लिहून मदतीची याचना केली. एका खासदाराच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा डेलकर यांना तातडीने मदत करु शकले असते, परंतु त्यांनी केलेले दुर्लक्ष जाणीवपूर्वक होते का ? असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

लोकसभेच्या हक्कभंग समितीमध्ये डेलकर यांनी आपले गाऱ्हाणे मांडताना आपल्या मनात असलेले आत्महत्येचे सुतोवाच केले होते का? याबाबत लोकसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी तातडीने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.

डेलकर यांनी आपल्याला भाजपा नेते, दादरा नगर हवेलीच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून छळ होत असून सातत्याने अपमानित केले जात आहे. २०-२० वर्षांपूर्वीचे त्यांचे संबंध नसलेले गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहेच, पण ज्या गुन्ह्याशी त्यांचा संबंध नाही व आरोपपत्र देखील दाखल झालेले आहे अशी प्रकरणे पुन्हा उघड केली जात आहेत. कुटुंबाला जेलमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या जात आहेत अशा तक्रारी व मदतीची आर्त अपेक्षा व्यक्त करणारी पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १८ डिसेंबर २०२० रोजी आणि दुसरे पत्र ३१ जानेवारी २०२१ रोजी पाठवले होते व भेटीची वेळ मागितली होती. अशाच तऱ्हेची पत्रे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना १८ डिसेंबर २०२० रोजी व १२ जानेवारी २०२१ रोजी पाठवले होते. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनाही त्यांनी १८ डिसेंबर २०२०, १२ जानेवारी २०२१ व १९ जानेवारी २०२१ रोजी पत्रे पाठवली होती. १३ जानेवारी २०२१ रोजी संसदेचे स्थायी समितीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांनादेखील पत्र पाठवले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठवलेली पत्रे व त्यातील आशय पाहता आपला संसदेतील एक सहकारी अत्यंत दबावात आहे याची जाणीव पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी निश्चित होती. असे असताना तथाकथित ५६ इंच छातीचे सरकार ज्या व्यक्तीवर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे अशा खासदाराला वाचवण्यासाठी पुढे का आले नाहीत? का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? त्याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे. देशातील सरकार एका खासदाराचे संरक्षण करु शकत नसेल तर त्यापेक्षा अधिक नाकर्तेपणा कोणताही असू शकत नाही किंवा भयानक षडयंत्र असू शकत नाही असा आरोप त्यांनी केला.

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात बोंबाबोंब करणारे भाजपाचे नेते हे खासदार मोहन डेलकर आत्महत्येसंदर्भात गप्प का? असे विचारत कोणत्याही नेत्यांनी याबाबत संवेदनासुद्धा व्यक्त केल्या नाहीत हे अत्यंत दुर्दैवाचे असल्याची मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

१२ फेब्रुवारी २०२१ रोजी लोकसभेच्या हक्कभंग समितीसमोर खा. मोहन डेलकर यांच्या तक्रारीची सुनावणी घेण्यात आली होती. या समितीसमोर मोहन डेलकर यांनी या सर्व समिती सदस्यांसमोर त्यांच्यावरील मानसिक आघाताची जाणीव करून दिली होती. तसेच त्यांच्यासमोर खासदारकीचा राजीनामा देणे किंवा आत्महत्या करणे हे दोनच पर्याय असल्याचे सुतोवाच केले होते अशी माहिती समजते. यासंदर्भातील सत्यतेबाबत लोकसभा हक्कभंग समितीने तात्काळ स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. यानंतर केवळ १० दिवसातच डेलकर यांनी आत्महत्या केली. सरकारतर्फे तात्काळ पावले उचलली असती तर डेलकरांना वाचवता आले असते. मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या करण्याचे कारण म्हणजे वारंवार पंतप्रधान व गृहमंत्री यांना याचना करूनही त्यांनी मदतीकरता कोणतेही पाऊल न उचलल्याने केंद्रीय व्यवस्थेवर त्यांचा अविश्वास होता आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यांना न्याय देईल म्हणून त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्याचे ते म्हणाले.

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येला कोण जबाबदार हे भाजपाचे सरकार अजून शोधू शकले नाही व गुन्हेगारांना शासित करू शकले नाही. परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांना निश्चित शासन करेल व त्यांची हरेन पांड्या यांच्याप्रमाणे परिस्थिती होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *