Breaking News

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती.

राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच डॉक्टर, नर्सेस यांना ज्या काही निवडणूकीच्या ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत. त्या ड्युट्यांवर जाऊ नका तुमची ज्या कामासाठी रूग्णालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कामाच्या ठिकाणी जा आणि काम करा अशी बघू तुमच्या विरोधात कोण कारवाई करते असे सांगत केंद्रिय निवडणूक आयोगाला एकप्रकारे आव्हान दिले.

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले की, शिवसेनेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करायचे नाही असा निर्णय घेतला. त्यानंतर मी स्वतःचा पक्ष उभारला, तुमच्या सर्वांच्या साथीने इंजिन हे चिन्ह मिळवले. हा पक्ष आणि इंजिन हे महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेल्याशिवाय राहणार नाही अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, इथे जमलेल्यांपैकी अनेक जण पुढे आमदार, होतील, नगरसेवक होतील. त्यासाठी संयम हवा असे सांगत आगामी निवडणूकीत आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण थोड्या कालावधीचा विचार करायचा नाही. तर पुढच्या ५०-१०० वर्षाचा विचार करायचा असतो असेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्यावर मी निस्सीम प्रेम करतो, पण एखादी गोष्टी पटली नाही तर मी त्याचा टोकाचा विरोधही करतो. अमिताभ बच्चन यांच्यावर अख्खी जनता प्रेम करते, मी ही करतो. पण नंतर लक्षात आलं की, अमिताभ बच्चन एका विशिष्ट राज्याचा होतोय तेव्हा त्यांच्यावर मी टीका केली. परंतु ती टीका वैयक्तीक स्वरूपाची नव्हती. तशाच पध्दतीने या देशात नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असायला हवेत असे सांगणारा मीच पहिला होतो. त्यांच्या पक्षातीलही कोणी नव्हता. त्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांना मी पाठिंबा दिला. परंतु काही वर्षानंतर असे लक्षात आले की, हे तर काही वेगळेच सुरु आहे. ज्या गोष्टींची आश्वासने, घोषणा दिल्या होत्या त्या पूर्ण होताना दिसत नव्हत्या.

त्यामुळे मी ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटल्याच नाहीत. त्यामुळे मी मध्यंतरी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच मी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ लावायचो, पण त्याला कोणी तरी लाव रे तो व्हिडिओ म्हणून टॅगलाईन चिटकावली आणि तो लावरे व्हिडिओ म्हणूनच प्रसिध्द झाल्याचे यावेळी सांगितले. मध्यंतरी माझ्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटायला आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मला म्हणाले की, आपण एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी करू या. बर महाराष्ट्रासाठी नक्की काय करू असे विचारचो पण ते काही स्पष्ट सांगत नव्हते असा खुलासाही यावेळी राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, तुम्हाला राज्यसभा आणि एक-दोन लोकसभेच्या जागा भाजपाकडून देऊ. त्यानंतर जसे बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटायला दिल्लीत गेले होते. तसे माझेही भाजपा वाल्यांशी सर्वाधिक जास्त संबध आलेले असल्याने मी ही अमित शाह यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनीही खासदारकी, आमदारकी आदी गोष्टींवर चर्चा केली. तसेच शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील काही फुटीर आमदार देऊन शिवसेना पक्ष तुम्हाला देऊ असे त्यांच्याकडून मला सांगण्यात आले. पण मी स्पष्टच सांगितले की, मला आता दुसऱ्याच्या गोष्टी नको आहेत ज्या काही आहेत ते आता माझ्या आणि माझ्या समर्थकांच्या बळावर निर्माण केलेल्या गोष्टींनाच पुढे न्यायचे असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या महाराष्ट्रावर माझे निस्सिम प्रेम आहे. सध्या जे काही महाराष्ट्रात सुरु आहे. त्यावर आपल्यालाच मार्ग काढायचा आहे. त्यामुळे तुम्ही संयम बाळगावा असे सांगत माझ्या महाराष्ट्राकडून काही अपेक्षा आहेत, सध्या कोणाच्या सोंगट्या कोणत्या भोगात आहेत हे काही कळायला मार्ग नाही असे सांगत राज ठाकरे यांनी दोन्ही हात जोडत कृपया व्याभिचारी राजकारणाला राजमान्यता देऊ नका असे नम्र आवाहन करत लोकसभा निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा या पक्षांना परंतु सध्याच्या परिस्थितीत सक्षम नेतृत्वाची गरज आहे, काही गोष्टींसाठी देशाला मजबूत नेतृत्वाची गरज असल्याने केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे असे जाहिर करत आगामी विधानसभा निवडणूकीला लागा असे आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *