Breaking News

भाजपावाल्यांनाच रेमडेसीवीर कसे मिळते? आगामी काळात भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

राज्यासह देशात कोरोनाबाधित रूग्णांसाठी रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात आणि जळगांवातील भाजपाच्या माजी आमदाराकडून रेमडेसिवीर औषधांचे मोफत वाटप, त्याचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना ब्रुक फार्मा कंपनीकडूनही रेमडेसिवीरचा साठा उलब्ध होणार असल्याचे सांगितले. रूग्णांसाठी रेमडेसीवीर औषधे उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार एकाबाजूला प्रयत्न करत असताना भाजपावाल्यांकडे याचे साठे कसे असतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

आम्हाला याविषयीचे राजकारण करायचे नाही. परंतु हे साठे यांच्याकडेच कसे उपलब्ध होतात याविषयीचा मुद्दा जनहितासाठी उपस्थित केला. मात्र आगामी काळात भाजपाच्या अनेक नेत्यांचे गौडबंगाल बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला.

माझा राजीनामा मागताय… पोलिस ठाण्यात तक्रार देताय… महामहिम राज्यपालांकडे जाताय… या देशात मोदी नावाचा कायदा आलाय का? त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांकडे देण्यात आले आहेत का? मोदी कायदा आला असेल आणि अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे असेल तर त्याची माहिती द्यावी अशी मागणी करतानाच मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच असे ठामपणे सांगितले

दरम्यान आज पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपच्या माजी आमदाराने रेमडेसिवीरचा केलेला काळाबाजार याची माहिती माध्यमांसमोर पुराव्यानिशी मांडली. याचवेळी काही कागदपत्रे आणि व्हिडिओ माध्यमांना दिले.

या देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले. त्याचकाळात भाजपाच्या सुरत येथील कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकरणावर आम्ही बोट ठेवले. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर वाटप करण्यास किंवा साठा करण्यास परवानगी दिली नसल्याचा स्पष्ट खुलासा केला होता. त्यादिवसापासून भाजपचे काही नेते ५० हजार रेमडेसिवीर आणून देऊ असा दावा करत होते. भाजपच्या माध्यमातून मे – एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध झाला होता असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपाचे जळगाव – अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुप चालवणारे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता. त्यांनी स्वतः फोटो जाहीर केले आहेत. त्यामध्ये ग्रुप फार्माला ओन्ली फॉर एक्स्पोर्ट हे औषधांवर लिहिलेले असताना ८ एप्रिल रोजी चौधरी बांधवाकडून रेमडेसिवीर रांगा लावून वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवस लॉकडाऊन असल्याने वाटप करण्यात येणार नाही असे सांगून १२ एप्रिलला पुन्हा वाटप करण्यात आले. जवळपास ७०० – ८०० इंजेक्शन वाटण्यात आले आहे परंतु आमच्या माहितीनुसार २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी ७०० – ८०० इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आल्याचा आरोप करत हिरा ग्रुपचे शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने परवाना दिला होता का? किंवा दमणच्या एफडीएने परवाना दिला होता का? असा सवालही  त्यांनी यावेळी केला.

एखादा नेता जो आमदार राहिलेला आहे. तो बेकायदेशीरपणे २० हजाराचा साठा ठेवतोय, विकतोय, वाटप करतोय आणि नंतर तोच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटला होता. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात धंदा सुरू होता. त्याचवेळी आमचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे तक्रार करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसापूर्वी यावर एक प्रश्न निर्माण केल्याचे सांगताना रेमडेसिवीरचा तुटवडा असताना निर्यात कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आमचे अधिकारी संपर्क करत होते. मात्र रेमडेसिवीर आम्हाला द्यायला तयार नाही अडवणूक करत होते. ब्रुक फार्माला राज्य सरकारच्या एफडीएने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित दमणच्या एफडीएने महाराष्ट्राला रेमडेसिवीर देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. हाच मुद्दा तीन दिवसापूर्वी उपस्थित केला होता. केंद्राकडून अडवणूक होतेय ती थांबली पाहिजे त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि तुटवडा दूर करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही राजकारणासाठी हा विषय आणला नव्हता तर जनहितासाठी समोर आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रुक कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वकिलपत्र घेऊन गेले होते. त्यानंतर माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात झाली. मी सांगू इच्छितो, माझ्या जावयाचा विषय समोर आणला जात आहे. जावयाला अटक झाल्यामुळे नवाब मलिक केंद्राच्या विरोधात आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी मी स्पष्ट सांगितले होते की, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. जो काही निर्णय न्यायालयात होईल तो होईल. जे सत्य आणि असत्य आहे ते बाहेर येईलच असे ते म्हणाले.

माझ्याकडे बोट दाखवत असताना क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो की, तुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भांडाफोड आज ना उद्या करणारच, भतीजाचा भात किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार आहे. कांदिवली – मालाडचे जे आमदार आहेत ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतलंय. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येणाऱ्या काळात सांगू असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आम्ही मुद्दा उपस्थित करतो त्याचे उत्तर अपेक्षित आहे. ही साठवण करणारी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काळाबाजार करत आहेत त्यांना वाचवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. हे राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सीजनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिवीर लोकांना भेटेल. केंद्र सरकारकडून जे विषय दुर्लक्षित होतायत. त्याकडे लक्ष द्या असे सांगितल्यावर व विषय समोर आल्यावर केंद्र सरकार जागे झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्हयात काळाबाजार सुरू आहे त्याची संपूर्ण माहिती, फोटो आणि व्हिडिओ देत असून नंदुरबारमध्ये कारवाई सुरू झालीय. इतर दोषींवर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *