Breaking News

टायगरचा अनोखा दोस्ताना गावठी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी

दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ… असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ सध्या ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या ‘बागी २’ या सिनेमाचं प्रमोशन करण्याऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचं प्रमोशन करतोय. तेही मैत्री खातर…

३० मार्चला टायगर श्रॉफचा बहुचर्चित ‘बागी २’ होणार असून याच दिवशी मराठीत आर. बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतील आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. ‘गावठी’ या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ ॲण्डी हा सिने-नृत्य दिग्दर्शक रेमो डीसोजा यांचा सहायक आहे. ‘फ्लाईंग जाट’ या रेमो डिसोजा दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ अभिनित चित्रपटाच्या शुटींग दरम्यान टायगरला डान्सस्टेप तसंच सीन समजावून सांगण्याचं काम अर्थातच आनंदकुमार उर्फ ॲण्डी यांचं होतं. ॲण्डीचा डान्स आणि दुवे हेरून शिकविण्याच्या पद्धतीवर टायगर खुश होता. त्यात ॲण्डीचा शांत, संयमी, मितभाषी आणि विनम्र स्वभावामुळे टायगर आणि ॲण्डीची चांगली गट्टी जमली. फ्लाईंग जाट येऊन गेला, पण टायगरने ॲण्डीशी मैत्री कायम ठेवली. ॲण्डीने एक मराठी फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि ती उत्तम झाल्याचे टायगरला रेमो डिसोजाकडून समजले तेव्हा त्याने फोन करून ॲण्डीचं अभिनंदन केलं.

गुरूस्थानी असलेल्या रेमो डिसोजा सरांच्या हस्ते पहिलं गाणं प्रकाशित झाल्यानंतर टायगरच्या हस्ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि दुसरं ‘भन्नाट…’ हे गाणं प्रकाशित व्हावं, अशी ॲण्डीची इच्छा होती. परंतु, ‘गावठी’ आणि ‘बागी २’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने आता टायगर आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार नाही, हे मनाशी धरून दिग्दर्शक ॲण्डीने टायगरकडे कधी विचारणा केली नाही. परंतु, टायगरने एखादे ट्वीट किंवा शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीयो अपलोड करावा, या हेतूने ॲण्डीने टायगरला एक फोन केला. बोलण्याच्या ओघात ॲण्डीने त्याच्या मनातील इच्छा टायगरला सहज बोलून दाखवली. तेव्हा टायगरने ट्रेलर आणि दुसरं गाणं लाँच करण्यासाठी लगेच होकार दिला, इतकंच नाही तर तारीख आणि वेळही सांगितली. त्यामुळे मुंबईत एका भव्यदिव्य सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते ‘गावठी’ या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसऱ्या गाण्याचं संगीत प्रकाशीत झालं. इतकंच नव्हे तर टायगर आणि बॉस्कोने ॲण्डीसोबत ‘भन्नाट…’ या आयटम साँगवर डान्सही केला.

अॅण्डीसरांनी दिग्दर्शित केलेला ‘गावठी’ हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असेल अशी आशा व्यक्त करीत ट्रेलर आणि गाणं पाहून चित्रपटाबद्दल उत्सुकता लागल्याचं टायगर म्हणाला. ‘बागी २’ आणि ‘गावठी’ एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरीही ‘गावठी’ नक्की पाहणार असल्याचं आश्वासनही टायगरने दिलं. या सोहळ्याला येऊन टायगरने समस्त नृत्यकलाकारांचा सन्मान केला आहे. अशा शब्दात नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांनी टायगरचे आभार मानताना ॲण्डी आणि गावठीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला टायगर सोबत बॉस्को मार्टिस, डॉ. पी. अनबलगन – आय.ए.एस, कथा लेखक व निर्माते सिवाकुमार रामचंद्रन त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य कलाकार श्रीकांत पाटील व योगिता चव्हाण तसेच संदीप गायकवाड, गौरव शिंदे, संगीतकार अश्विन भंडारे तसेच श्रेयश यांच्या सोबत चित्रपटाच्या प्रस्तुतीसाठी पुढाकार घेणारे कासम अली, समीर दिक्षीत आणि ऋषिकेश भिरंगी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *