Breaking News

दिलीपकुमारांमुळे महाराष्ट्रात एक वेगळ्याच राजकिय युतीला लागला होता “ब्रेक” भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा पहिला प्रयोग होता होता राहिला

मराठी ई-बातम्या टीम

साधारणत: १९९९ साली काँग्रेस पक्षात सोनिया गांधीच्या मुख्य लीडरशीपवरून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या मुख्यस्थानी हे त्यावेळचे अमर-अकबर-ऑन्थोनी अर्थात शरद पवार, तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा. या तिघांनी काँग्रेसतंर्गत लीडरशीपचा आणि सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडवून दिली. त्यावेळी केंद्रात १३ महिन्यांचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतत्वाखालील भाजपाप्रणित सरकार होते. त्यावेळी भाजपा नेत्या सुषमा स्वराज्य आणि अन्य नेत्यांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माच्या मुद्यावरून एकच रान उठविले होते.

दस्तुरखुद्द काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून पक्षांतर्गत राजकारणात एकच खळबळ उडवून दिल्याने काँग्रेसनेच या तिघांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर शरद पवार, तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा यांनी एकत्रित येत पंचवीस मे १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. नेमक्याच याच काळात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अविश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागत एका मताने पराभव झाला. त्यामुळे देशात निवडणूकीचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्रात काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी पवारांनी महाराष्ट्रात दौरे करायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील काना-कोपरा पिंजून काढायला सुरुवात केली. तसेच काँग्रेसमधील अनेक मातब्बरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे आवतन पाठवायला सुरूवात झाली होती.

परंतु मागच्या दाराने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्याकडून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते स्व.प्रमोद महाजन यांच्या माध्यमातून एका वेगळ्याच युतीला जन्म देण्यासाठी हालचाली सुरु होत्या.  त्यावेळी भाजपाची अवस्था दुय्यम स्थानी आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेवर अवलंबून असायची. तसेच राज्यातही फारसे संघटन आणि राजकिय ताकद भाजपाला त्यावेळी करता आली नव्हती.

त्यावेळी जर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपामध्ये आघाडी झाली असती तर राज्यातील मुस्लिम आणि मागासवर्गीय आणि ओबीसींचे मते मिळून महाराष्ट्रात पहिल्यांदा या वेगळ्याच राजकिय पक्षांच्या युतीचे सरकार आले असते. या गोष्टीची कुणकुण त्यावेळी काँग्रेसमधील नेत्यांना लागली.

परंतु त्यावेळी शरद पवारांना रोखण्यासाठी काँग्रेसकडे पवारांच्या तुलनेत असलेला नेता नव्हता. त्यामुळे काँग्रेसची परंपरागत मते कशी राखायची असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडला. त्यावेळी काँग्रेसच्या एका नेत्याने महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजात चळवळीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधला (काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याने आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांचे नाव प्रसिध्द करू शकत नाही.) आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून भारतीय चित्रपटतील अनभिषिक्त सम्राट असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी संपर्क सुरु केला. नेहरू काळापासून दिलीपकुमार हे तसे काँग्रेसचे एकप्रकारे समर्थक होते. मात्र त्यांना काही वाईट अनुभव आल्याने त्यांनी कोणत्याही राजकिय पक्षाच्या जवळ न जाण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु महाराष्ट्रात पवारांना रोखायचे तर त्यांच्या दिलीप कुमार यांना काँग्रेसच्या प्रचारात उतरवले पाहिजे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती.

त्यामुळे त्या व्यक्ती मार्फत दिलीप कुमार यांच्याशी संपर्क आणि गाठी भेटीचे प्रयत्न सुरु होते. अखेर निवडणूकीच्या एक महिना आधी दिलीप कुमार यांची भेट ठरली. त्यादिवशी दुपारी ३ वाजण्याच्या वेळी बैठकीची वेळ निश्चित झाली. या भेटीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, स्व. प्रणव मुखर्जी हे आले. त्यांनी दिलीप कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दिलीपकुमार यांचा झालेला गैरसमज दूर केला गेला. आणि राज्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपाचे सरकार आणि त्या नव्या राजकिय समीकरणाचा राजकारणात चुकीचा पायंडा पडेल या कारणावर एकमत होत ती बैठक विसर्जित झाली. ही बैठक तब्बल दोन तास सुरु होती.

त्यानंतर जवळपास मुस्लिम बहुल असलेल्या महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये दिलीप कुमार यांच्या सभांचे आयोजन काँग्रेसने केल्या. त्यातील एक सभा सोलापूर तर दुसरी मालेगांव येथेही झाली. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला आणि काँग्रेसची फुटणारी मत शाबूत राहीली. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला जवळपास ७५ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षित जागा न वाढल्याने अखेर शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसशी हात मिळवणी करत राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदी स्व. विलासराव देशमुख स्थानापन्न झाले.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *