Breaking News

दिलीप कुमार यांनी दिल्या होत्या नवख्या कलाकारांसाठी “या” टीप्स मी प्रचारकी चित्रपटाच्या विरोधात

मराठी ई-बातम्या टीम

बॉलीवूडचे अनभिषिक्त सम्राट, अभिनयाचे विद्यापीठ, ट्रेजडी किंग सारख्या अनेक लोक पदव्यांनी ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, त्या दिलीप कुमार यांचा ९९ वा जन्मदिवस. ७ जुलै २०२१ ला जरी त्यांचे निधन झालेले असले तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते आजही आपल्या अवतीभवती आहेत.

चित्रपट क्षेत्रात असूनही एक सुजाण नागरीक म्हणून त्यांनी निभावलेली जबाबदारी आणि नव्याने चित्रपट क्षेत्रात येवू पाहणाऱ्यांसाठी काही मोलाचे सल्ले त्यांनी यापूर्वीच देवून ठेवले. त्यांनी एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील दूरचित्रवाहीनीला मुलाखत देताना चित्रपट निर्मिती, अभिनय त्यातले ठोकताळे याविषयीचे मते मांडली. त्याचबरोबर अभिनय करताना कोणत्या गोष्टी कराव्यात याच्या टीप्सही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

मुलाखती दरम्यान ते म्हणतात, कोणत्याही अभिनेत्याने एकदा आपल्या करिअरला सुरुवात केल्यानंतर एकाच पध्दतीच्या भूमिकेत अडकून पडून राहु नये. त्यावेळी मुलाखतकर्त्यांनी त्यांना प्रश्न केला की मग तुम्ही का ? सातत्याने दु:खद भूमिका करत राहीलात, त्यावेळी दिलीपकुमार यांनी दिलेले उत्तर खुप महत्वाचे असून ते म्हणतात, मी अनेक पध्दतीच्या भूमिका केल्या. पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मी ट्रेजडी जॉर्न निवडला. सर्व जण ज्या रस्त्याने जातात त्या ऐवजी दुसरा मार्ग निवडण्यात धोका असतो. मात्र जेव्हा त्या भूमिकांबाबत किंवा तुमच्या कामाबाबत लोक जेव्हा भविष्यवाणी करू लागतात तेव्हा तुम्ही मार्ग बदलला पाहिजे. अन्यथा तुमच्याबद्दलचे गुढत्व संपून जाते.

एखादी पटकथा असते त्यामध्ये तुमच्या भूमिकेविषयी लिहिलेले असते परंतु ते एखाद्या मर्यादे पर्यंत. त्यातील बारकावे, त्यातील महत्वाच्या असलेल्या जागा याविषयी तुम्हाला फारशा गोष्टी त्यात लिहीलेल्या नसतात किंवा त्या जागा रिकाम्या असतात. त्यावेळी तुम्हाला एक कलाकार किंवा अभिनेता म्हणून ती भूमिका किंवा ती व्यक्ती नेमकी काय आहे? हे समजून घेण्याची गरज लागते. त्यानंतर तुम्ही अभिनेता म्हणून त्या व्यक्तीच्या भोवती स्वत:चे वलय निर्माण करू शकता, आणि मी ते केलेलं आहे.

कोणताही एक व्यक्ती करमणूक प्रधान चित्रपटाची निर्मिती करू शकत नाही. त्यामागे असंख्य लोकांची मेहनत आणि त्यांचा सहभाग असतो पडद्यावर आणि पडद्या मागेही. त्याचाच एक परिपाक म्हणून आज दिलीपकुमार हा तुमच्यासमोर आहे. गंगा जमुना आणि राम और श्याम या दोन चित्रपटात काही सीनमध्ये व्यावहारीक आणि भावनिक पातळीवर काही सीनमध्ये आम्ही काही तडजोडी केल्या, त्यातील कोणत्या सीममधून काय साध्य होतंय आणि काय नाही हे पाहण्यासाठी आणि नंतर त्यातील कोणता भाग ठेवायचा आणि काढायचा असे ठरवून त्या गोष्टी केल्या. तर काही वेळा आम्ही त्यातील काही गोष्टी या थेट दिग्दर्शित आणि एडिट केल्या. त्यामुळे त्याचे श्रेय आम्ही घेवू शकत नाही. ती सर्वस्वी एका टीमची जबाबदारी असते.

त्यानंतर मुलाखतकर्त्याने दिलीपकुमार यांना पुढील प्रश्न विचारत तुम्हाला कोणत्या पध्दतीचे चित्रपट करायला आवडत नाहीत बोलतं करण्याचा प्रश्न केला तेव्हा दिलीपकुमार म्हणाले की, एक चांगला चित्रपट करण्याचा नेहमीच प्रयत्न असावा. परंतु मी उपदेश देणारे चित्रपट आवडत नाहीत. तुम्ही तुमच्या जीवनात चित्रपटाप्रमाणे कधीच ठरवू किंवा निश्चित उद्दिष्ट ठेवून जगू किंवा करू शकत नाही. जर चित्रपटात वाद असतील, त्यात अनपेक्षित घटना असतील तर तो चित्रपट स्वत: बोलायला लागतो. त्याचा प्रभावही रसिक प्रेक्षकांवर पडायला लागतो. परंतु एक व्यक्ती चित्रपटाचा उद्देश आणि हेतू ठरवू शकत नाही. त्यामुळेच मला प्रचारकी पध्दतीचे चित्रपट करायला आवडत नाहीत.

त्यामुळेच दिलीपकुमार यांनी अभिनय केलेले नया दौर, गंगा जमुना, मधुमती, देवदास, जुगुनू आणि मुघल ए-आझम सारखे चित्रपट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहीले आणि राहतील.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *