Breaking News

पडळकरांचा आरोप, एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून जमिनी… अनिल परबांना विश्वास जिंकण्यास अपयश

मराठी ई-बातम्या टीम

एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देवूनही अद्यापही कर्मचाऱ्यांचा संप सुरु राहिला असून या संपावर तोडगा काढण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांना अपयश आले आहे. गिरणी कामगारांच्या संपाप्रमाणे कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून एसटी महामंडळाच्या शहरातील कोट्यावधींच्या जमिनी हडपण्याचा डाव परब यांचा असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

पहिवहन मंत्री अनिल परबांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देतायेत. त्याचा आम्ही विरोध व निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे. त्याच चलाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काही मार्ग निघाला असता असेही ते म्हणाले.

पण ज्या पद्धतीने मुंबई मील कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला आणि नंतर मील मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील  करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

जवळपास २० दिवसाहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार अद्याप म्यान करण्यास तयार नसून पगारवाढ दिलेली असली तरी एसटी कर्मची विलनीकरणाच्या मुख्य मुद्यावर ठाम आहेत. तसेच विलनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची घोषणाही सातत्याने या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आता अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवार पर्यतचा अल्टीमेटम दिला असून सोमवारपासून कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येईल. अन्यथा संपाच्या भूमिकेवर कायम राहणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून ती नंतरच्या काळात मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जे कर्मचारी काम करतील त्यांनाच वेतन देण्याचा निर्णयही जाहिर केला असून संप काळातील पगार न देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहिर केले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी अद्याप संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी किती दिवस चालणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *