Breaking News

थडगं…कोरोनाच्या वावटळीतलं सद्यपरिस्थितीतील हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा: लेखक-सुदेश जाधव

धन्याची दुसरी पिढी मुंबईत बिगारी कामगार म्हणून काम करणारी. धन्याचा बाप नाल्यात गुदमरून कुत्र्याच्या मौतीने मेलेला. धन्याची आय कर्करोगान मेलेली. धन्याच्या बहिणीचं अजून लग्न नाही झालं आता पत्र्याच्या खोपटात धन्याची बायको, दहा वर्षाचा मुलगा, धन्या आणि त्याची बहिण मिळून चौघेच रहातात. बायकोची तब्बेत बिघडलेली होती, त्यामुळे धन्याची बायको आज गेली नाही .

धन्या कधी नव्हे तो आज लगबगीनं घराकडे  धावत आला. डब्बा तसाच होता आल्यानंतर फाटलेला शर्ट बदलला . सविता घाबरली चटई वरून उठून बसली पाणी दिलं आणि धन्याला विचारलं, “मारामारी झाली काय ?”.धन्या म्हणाला “ नाय भवतेक भायेर कसला तरी रोग आलाय कार्यकर्ते आले होते काय विचारायच्या आधीच मारायला सुरुवात केली रस्ता भेटेल तसे पळत सुटलो. आता बघतो उद्या जाऊन”. एवढ म्हणून सुरेश ने दिलेली दारूची बाटली काढली गटागट अधाश्यासारखा प्यायला आणि झोपून गेला. संध्याकाळी सुरेश धन्याच्या मागावर आला धन्या तसाच पडून होता. सुरेशने दारावरूनच आवाज दिला आणि धन्याला सांगितलं, ”काम आठवडा भर बंद हाय” . धन्या ताडकन उठून बसला. त्याचा मेंदू हलू लागला धडाधडा डोक्यात हिशोब सुरु झाला. आठवडाभर घरात बसलो तर बुच बसणार. सविता धावतच दारापाशी आली तिच्यात अचानक कुठून तरी ताकद आली जणू तिला काही झालच नव्हत. तिचे हात मात्र दाराजवळ गेल्यावर थरथरू लागले . सविता सुरेशला म्हणाली  “ आठवडाभर काम नाय म्हणजे ?“  सुरेश, ”म्हणजे वैनी तो भायेरच्या देशातन रोग आलाय तो आजार झालेला माणूस आपल्या जवळ येऊन शिंकला ना तर आपण मरणार ते माझ्या पोराच्या मोबाईलवर बघितला, म्हणून भायेर जाऊ नये म्हणून सांगितलाय.”  सुरेश आपण खूप ग्रेट माहिती सांगितली आणि धन्याला मरणाच्या दारातून वाचावाल्याच्या अविर्भावात निघून गेला. धन्याच्या घरात मयत झाल्यासारखी शांतता पसरली धन्या पटकन शर्ट घालून बाहेर निघाला तासाभरात धन्या घामाघूम होऊन आला. आल्या आल्या सविताशी बोलला तेही एकच वाक्य “ अजून कितीदिवस बाजार पुरल?”  सविता म्हणाली,”तीन चार दिवस तरी”.

धन्याच्या पोराची शाळा बंद झाली. सविता बरी झाली पण धुनी भांडी ज्या ज्या घरात करायची त्यांनी येऊ नको सांगितलं.  सविताने आजारपणात अंगावर पैसे घेतेलेले. त्यामुळे अजून पैसे मागण्याचा प्रश्नच नव्हता. धन्याला रोजचे पैसे हातावर मिळायचे. दोन तीन दिवसांनी अजून काही बाई वाऱ्यासारख्या बातम्या येऊ लागल्या. सगळं बंद घरातन कोणीच बाहेर पडायचं नाही. अशी ताकीद देण्यात आली. कोणाला बाहेर भेटायचं नाही आणि कोणाला आतमध्ये घ्यायचं नाही. धन्याची आणि सविताची हळू हळू चीड चीड वाढू लागली बारीक सारीक कारणावरून भांडण होऊ लागली बाजूच्या दोन घरातून चोरी झाल्या तेंव्हापासून दाराला अजून करकचून बांधून धन्यान घेतलं.

गल्लीत रहाणाऱ्या चायनीज गाड्यावर काम करणाऱ्या दोन पोरांना तिथल्या लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केली यांनीच रोग आणला यांनीच.  त्यानंतर ते तिथे दिसलं नाहीत. धन्याने आज सकाळ सकाळ जाऊन सुरेशकडून उसने पाचशे रुपये आणले  आणि सविताच्या हातात दिले. सविता म्हणाली,”गल्लीतलं पण दुकान बंद झालय”. धन्या ऐकून न ऐकल्यासारखं त्या तापलेल्या पत्र्याच्या खुराड्यात निपचित पडला.

धन्याला  त्याची झोपडी आता एका वाळवंटात असल्याची दिसू लागली. सगळ्या झोपड्या उध्वस्त होऊन जमिनदोस्त झालेल्या दिसायला लागल्या ताजे , जुने कीड लागलेल्या मुडद्यात तो बायकोला आणि पोराला  शोधू लागला. त्याची बहिण एका नुकत्याच मेलेल्या मुडद्यासोबत त्याला संभोग करताना दिसू लागली. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तो त्या मुडद्याना तुडवत तुडवत  सैरावैरा पळू लागला . धन्याला जाणवलं कि त्याला मागून कोणीतरी स्पर्श करतय. मागे वळून पाहतो तर सुरेश होता त्याच्या तोंडातून रक्त येत होत आणि धन्याला त्याने दिलेले पैसे मागत होता. आणि म्हणत होता, “माझे पैसे दे मग तुला सांगतो पोराचा आणि बायकोचा पत्ता” आणि त्याने धन्यावर झडप घातली. धन्याचा श्वास थांबला. इतक्यात धन्याला शंखं,ढोल ,ताशा ,ताट, वाट्या ,परात वाजवणारे मुडदे त्याच्या शरीरावर उभे राहून जोर जोरात वाजवत होते आणि मोठ मोठ्याने हसत होते पैसे दे पैसे अगदी त्याच्या कानातून रक्त येई पर्यंत आला दरदरून त्याला घाम फुटला शंखं,ढोल ,ताशा ,ताट, वाट्या ,परात वाजवत होते .धन्या खडबडून जागा झाला . जाग आल्यानंतर हि त्याच्या कानाला तो आवाज अजून झोंबून उठला. त्याने दाराकड पाहिलं त्याचा पोर जोर जोरात परात बडवत होता, झोपडीच्या बाहेर येऊन पाहिलं तर अख्या गल्लीत ते बिल्डींग मधून तसाच त्याला आवाज ऐकू येऊ लागाला. त्याला कळेना हे आपल्याला पडलेलं स्वप्नच आहे का. इतक्यात सविता येऊन बोलली “कोण तरी बोललं रोगाला पळवून लावण्यासाठी वाजवा. उद्यापासून हा रोग थांबेल आणि उद्यापासनं काम सुरु होईल अस म्हणताहेत बरं होईल एकदा “ या मेले ब्यानरावर फोटू काढून स्वताचं लावतील आणि भाषणं देऊन जातील, पण  घरात बस्लाव तर चार दोन पैशे देऊ म्हणून बोलणार नाय ”. आणि सविता पोराला अजून जोरात वाजवण्यासाठी  सांगून घरात निघून गेली.

धन्या पुन्हा येऊन तसाच विचार करत बसून राहिला. पत्र्याच्या छिद्रातून  उन्ह केंव्हाचाच  निघून गेलं तरी धन्या जागेवर तसाच पुताल्यासाराखा बसून राहिला. त्याला एकाच प्रश्न होता खायचं काय? तोंडावर पाणी मारलं, आणि पुन्हा येऊन झोपला .रात्री जेवणाच्या वेळेला सुरेश आला आणि म्हणाला “अजून २१ दिवस काम बंद हाय”. आणि घरातन अज्जिबात भायेर पडायचा नाय अस सांगितला हाय”.  तो सहजपणे सांगून गेला. धन्याच्या आणि सविताच्या पायाखालची मातीच सरकली. धन्याची बहिण कपड्याची पिशवी भरून घेऊन सरळ मैत्रिणीकड रहायला चालेय सांगून घराबाहेर निघून गेली. धन्या तसाच तडक उठला आणि बाहेर निघाला तो सकाळी आला दुपारी पोलीस येऊन धन्याला उचलून घेऊन गेले एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात त्याला पोलीस घेऊन गेले दोन दिवसांनी पोलीस येऊन सविताला सांगून गेले धन्याला पण रोगाची लागण झालीय. त्याला भेटता येणार नाही अस सांगून सविताची आणि पोराची टेस्ट घेण्यात आली. त्यांना लागण नाही झाल्याच सिध्द झालं पण तिची झोपडी मात्र वाळीत टाकल्या सारखी झाली.    बाहेर भयान शांतात होती, लोकांकडचे पैसे संपले लोक चोऱ्या-माऱ्या करू लागले,  हॉस्पिटलाच्या रांगा वाढू लागल्या खाजगी हॉस्पिटल अवाजवी पैसे घेऊन इलाज करू लागले . सगळे नियं धाब्यावर बसून लोक रस्त्यावर येऊ लागले. दुकान फोडली जाऊ लागली.  नेत्यांनी अजून भ्रष्टाचार वाढवला . लोक स्वत:हून मरण स्वीकारायला लागली. श्रीमंतांनी स्वत:हाला चार भिंतीत व्यवास्थीत बांधून घेतलं झोपडपट्ट्या स्मशानात बदलून गेल्या  श्रीमंतांनी आणलेला रोग गरीबाच्या जीवावर उठला असा म्हणत कैक त्या वेडाच्या भरात रस्त्यावर ओरडत फिरू लागले. मंदिराच्या उभारणीसाठी सज्ज व्हायचं लोकांना आव्हान केलं गेलं आणि सगळे डोळे झाकून मुडद्या सारखे चालत निघाले. धन्या मेला कि जिवंत हे कळेना सविताने धन्याला रोगाची लागण झाल्यापासून झोपडी उघडलीच नाही. बाजूच्यांनी हि विचारलं नाही शेजारी राहणारी पारू मात्र सगळ्यांना सांगू लागली कि आतून दोघांचाही खोकण्याचा आवाज एक दोनदा आला होतो. आणि पारो संध्याकाळचं टीव्हीवर प्रवचन ऐकायचं म्हणून आतमध्ये निघून गेली. सरकार मरणावर उपाय तर लोक भुकेवर उपाय शोधत आता रस्त्या रस्त्यावर भटकत आहेत.

Check Also

अक्षर ओळख शिकणारा ते कष्टकरी चळवळीचा शाहिर-साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे ! सामाजिक जाणिवेतून व्यवस्थेतील त्रुटीवरील भाष्यकार सुबोध मोरे यांचा खास लेख

एकजुटीचा नेता झाला, कामगार तय्यार… !     बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार..!      …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *