Breaking News

पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा भार म्हाडावर मात्र ३ विकासकांशी करार करून कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी

येथील गोरेगांवमधील सिध्दार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करुन हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुनर्विकासाचे काम कालबद्धरितीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर म्हाडाने प्रस्तावित केल्याप्रमाणे सदर प्रकल्पामध्ये विक्री इमारतींचे बांधकाम जवळपास पूर्ण केलेल्या ३ विकासकांबरोबर म्हाडाचे हित विचारात घेऊन म्हाडाने समझोता करार करण्याचे आदेश त्यांनी दिले.

म्हाडा या प्रकल्पाचा स्वत: विकास करेल. हे करीत असतांना पत्राचाळ येथील मूळ ६७२ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा हिस्सा /  इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन त्यांना रितसर गाळयांचा ताबा देण्यात येईल. म्हाडा हिश्यातील सोडत काढलेल्या ३०६ सदनिकांच्या इमारतींची उर्वरित कामे म्हाडाने तातडीने पूर्ण करुन संबंधितांना सदनिकांचा रितसर ताबा देण्यात येईल. संपुर्ण पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडातर्फे पुर्ण करावयाचे असल्याने प्रकल्पाचे काम म्हाडाने सुरु केल्यानंतर रहिवाश्यांचे भाडे देण्याचे दायित्व म्हाडाचे आहे. सबब, यासंदर्भात उचित निर्णय घेण्याबाबत म्हाडास प्राधिकृत करण्यात करण्यात येईल. तसेच मूळ रहिवाशांच्या थकीत भाडयाबाबत म्हाडाने व्यक्त केलेल्या अभिप्रायानुसार कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अंतिम ओदशाची प्रतिक्षा करण्यात यावी. तसेच याअनुषंगाने म्हाडाने कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.

 २.५ चटई क्षेत्र निर्देशांकानुसार विकासकाने त्यांच्या हिश्यास अनुज्ञेय असलेल्या विकास हक्कापेक्षा अतिरिक्त विकासहक्क वापर केल्याबाबत :-

विकासकाने विक्री हिश्श्यासाठी उपलब्ध असलेल्या बांधकाम क्षेत्रफळापेक्षा म्हाडाच्या हिश्श्याच्या जे जास्तीचे ५९,२८१ चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम केले आहे, त्याबाबत विकासकांचे दायित्व तज्ञ तांत्रिक समितीने प्रकल्पाची परिगणना केल्यानुसार म्हाडाने कालबध्द पध्दतीने ते वसूल करण्याबाबत सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.

लेखापरिक्षणानुसार म्हाडाच्या हिश्श्यात वाढ झालेल्या क्षेत्रफळावर व विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ नुसार म्हाडास प्राप्त होऊ शकणारा सुधारीत लाभ :-

लेखापरिक्षणानुसार म्हाडाच्या हिश्श्यामध्ये वाढ झालेल्या ८०,७१०.०६ चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम व विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ नुसार ४ FSI नुसार अतिरिक्त ७३,२४१ चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम, म्हाडाच्या प्रस्तावानुसार न्यायालयांच्या आदेशाच्या अधीन राहून, म्हाडा हिश्श्याच्या भुखंड क्र.आर-१, २, ३, ४ व ५ तसेच विकासक गुरु आशिष यांनी भूखंड / भूखंडाचे विकास हक्क विक्री केलेल्या ९ विकासकांपैकी ज्या विकासकांकडील भूखंडावर कोणतेही बांधकाम झालेले नाही अशा मोकळया ११ भुखंडांवर (R-7/B-1, R-7/B-5, R-7/A-1, R-7/A-2, R-7/A-3, R-7/A-6, R-7/A-7, R-7/A-8, R-7/A-10, R-12 (Part), R-13) चटई क्षेत्र निर्देशांकांचा जास्तीत जास्त वापराचे नियोजन करुन त्यानुसार मिळणारा लाभ म्हाडाने घ्यावा. हे करत असताना म्हाडाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची म्हाडाने दक्षता घ्यावी.

प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता उपाययोजना :-

प्रकल्प आर्थिकदृष्टया सक्षम करणे, म्हाडा हिस्सा व पुनर्वसन हिस्सा यांच्या बांधकाम खर्चापोटी म्हाडास होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी समितीने शिफारस केल्यानुसार, उपलब्ध होऊ शकणारे अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ बाजारभावाप्रमाणे विक्री करण्यास म्हाडा अधिनियम, 1976 च्या कलम 164 (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार म्हाडास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी.

करारनाम्यानुसार पुनर्वसन हिश्यातील व म्हाडा हिश्यातील बांधकाम दायित्वाच्या पूर्ततेबाबत:-

म्हाडाच्या स्तरावर उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांनी तज्ञ तांत्रिक समितीचे गठन करावे. सदर समितीमध्ये म्हाडाचे तीन प्रतिनिधी व २ तज्ञ यांचा समावेश असावा. या प्रकल्पामध्ये म्हाडाला उत्पन्न होणारा महसूल, बांधकाम खर्च, म्हाडाचे येणे इत्यादींची परिगणना या समितीने करावी. समितीने सर्वसंबंधितांना सुनावणीची संधी देऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावी. हे करत असताना म्हाडाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची म्हाडाने दक्षता घ्यावी.

बांधकाम पूर्ण केलेल्या विकासकांबाबत :-

म्हाडाने प्रस्तावित केल्याप्रमाणे सदर प्रकल्पामध्ये विक्री इमारतींचे बांधकाम जवळपास पूर्ण केलेल्या ३ विकासकांबरोबर म्हाडाचे हित विचारात घेऊन म्हाडाने समझोता करार करावा.

एन.सी.एल.टी. मधील प्रकरण :-

म्हाडाची जमीन लिक्विडेशन इस्टेटमधून वगळण्यासाठी म्हाडाने सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करुन, राष्ट्रीय कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) तसेच अन्य न्यायालये / प्राधिकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडावी.

सदर प्रकल्पासंदर्भात उच्च न्यायालय तसेच कंपनी लॉ ट्रिब्युनल याठिकाणी दावे दाखल झालेले असल्याने व या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय व कंपनी लॉ ट्रिब्युनल यांनी आदेश पारीत केले असल्याने, याबाबत मा.मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात कार्यवाही करतांना वरीष्ठ विधीज्ञांसमवेत विचारविमर्श करुन,  उच्च न्यायालयास तसेच कंपनी लॉ ट्रिब्युनल यांना अवगत करावे.

हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. या पुनर्विकास प्रकल्पामधील मूळ रहिवाशांचे पुनर्वसन करणे, मुळ रहिवाशांचे थकीत भाडे देणे, म्हाडा हिश्यातील बांधकामाच्या सोडतीमधील ३०६ विजेत्यांना सदनिकांचे वितरण करणे या व इतर मुद्यांच्या अनुषंगाने या प्रकरणातील न्यायालयाचे आदेश विचारात घेवून उपाययोजना सूचविण्यासाठी जॉनी जोसेफ, सेवानिवृत्त मुख्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी त्यांचा सविस्तर अहवाल दोन भागात शासनास सादर केलेला आहे. या अहवालात त्यांनी केलेल्या शिफारशी व त्यानुषंगाने म्हाडाने सादर केलेले अभिप्राय विचारात घेऊन पत्राचाळ येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत शासनाने हा निर्णय घेतला.

Check Also

समीर वानखेडे यांच्याकडील आर्यन खानसह ६ केसेस एनसीबीने काढून घेतल्या दिल्लीची टीम करणार या हायप्रोफाईल केसचा तपास

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज केस प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *