Breaking News

नानांच्या नाना तऱ्हा… विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी

नाना पटोले यांचा नवा चेहरा पुनः महाराष्ट्राला पाहायला मिळाला. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे, नाना यांचा बैठकीत मुजरा आणि मिडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालं असून नानाच्या नाना तऱ्हा, असा टोला आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज ओबीसीच्या आरक्षणावर बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरही उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, भाजपचे नेते तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील बैठकीत तसेच आजच्या बैठकीतही ओबीसी आरक्षणाचा तिढा कसा सुटावा यासंदर्भात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनीही समर्थन केले. असे असताना त्या सभागृहांतील बैठकीत देवेंद्रजीच्या सूचनांचे कौतुक करत असताना, त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत असताना नाना पटोले यांच्या रक्तातला राजकीय अभिनिवेश प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर जाऊ शकत नव्हता आणि म्हणून या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात जी काही दिरंगाई झाली ती केवळ भाजपमुळे, अशा प्रकारचा आरोप नाना यांनी केला.

नाना यांना राजकीय कावीळ

नाना यांना राजकीय कावीळ झाली आहे. त्यामुळे राजकीय वक्तव्य केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसता येत नसल्याची टीका दरेकर यांनी केली. ते म्हणाले, नाना यांचे सहकारी अशोक डोंगरे आणि काँग्रेसचे माजी आमदार किसनराव गवळी यांचे चिरंजीव विकास गवळी यांनी ओबीसी आरक्षणाविषयी याचिका दाखल केली. त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली असून नाना पटोले यांनी याचे उत्तर द्यावे. या गोंधळाचे मूळ शिल्पकार आपल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी आहेत. परंतु आपण गोंधळी नाना असल्यामुळे आपण केवळ राजकीय वक्तव्ये करत आहात. त्यामुळे या सर्व परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे पुनः एकदा सिद्ध झाले आहे.

नानांच्या नाना तऱ्हा..

दरेकर म्हणाले, खरं म्हणजे ज्या प्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ओबीसी आरक्षणाविषयी सूचना दिल्या त्याचे मोठ्या मनाने नाना पटोले यांनी स्वागत करायला हवे. सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री वडेट्टीवार यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले, तसेच नाना पटोले यांनी सुद्धा केले. परंतु बाहेर येऊन नाना यांचा गोंधळ थांबत नव्हता आणि त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करण्याऐवजी राजकीय टीका करण्यात धन्यता मानली. तसेच नानाच्या नाना तऱ्हा असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

Check Also

तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *