Breaking News

निर्बंध शिथीलीकरणासाठी शिवसेना खासदाराच्या जावयाकडून थिअटर मालकांशी वाटाघाटी! गोविंदा काय लादेन आहेत का? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते.  राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी करत शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशारा ही यावेळी त्यांनी दिला.

तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेलेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमदार अॅड आशिष शेलार यांनी वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बळाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काय महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय?  म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय?  ज्या पद्धतीने बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल असे ही ते म्हणाले.

गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र असल्याची टीकाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का? आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी सम प्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषद आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही ते झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन २०१९ पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बाद में सरकार”  तर २०२१ ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!” असा सणसणीत टोला लगावत ते म्हणाले की, स्वतंत्रता आंदोलनाबद्दल तर मुख्यमंत्र्यांनी बोलूच नये, अगोदर ७५ वेळा हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे, बोलावे! असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

खा.संजय राऊत यांना अंतर्गत धोका असावा

खा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हे ही दिसतेय.. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला त्यांनी लगावला.

Check Also

तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *