Breaking News

शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका, …चिंता वाटायला लागली नेहरूंची विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना

राजधानी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजुरी दिलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या उद्घाटनादरम्यान वैदिक पध्दतीन संसदेच्या परिसरात हवन करण्याबरोबरच अनेक साधू-संताचा वावर संसदेत पाह्यला मिळाला. तसेच ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

शरद पवारांनी नेहरूंच्या संकल्पनेच्या उलट घडामोडी संसद भवन उद्घाटन सोहळ्यात चालल्याची भूमिका मांडली. आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय, अशी खंतही शरद पवार यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करणं ही त्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत, त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभेचे अध्यक्ष दिसले याचा आनंद आहे. पण राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती आहेत. पण त्यांची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मर्यादित घटकांसाठीच होता का? असा प्रश्न आहे, असा खोचक सवालही केला.

तसेच शरद पवार पुढे म्हणाले, जुन्या संसदेशी आमची बांधिलकी आहे. ही बांधिलकी मी खासदार आहे म्हणून नाही. देशात दिल्लीत कुणीही आल्यानंतर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट या गोष्टी बघण्याचं औत्सुक्य असतं. आता ते सगळं त्याचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. का आहे कुणास ठाऊक. पण ठीक आहे, आता निर्णय घेतला, राबवलाय, असं यावेळी म्हणाले.

नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा, त्याचं नियोजन, आराखडा यासंदर्भात इतर पक्षातल्या नेत्यांशी चर्चा झाली नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे वगैरे यासंदर्भात संसदेत बोललं गेलं नाही. त्यासंदर्भातल्या आराखड्याची चर्चाही कदाचित मर्यादित लोकांशी केली असेल. त्यामुळे आमच्यासारख्या अनेकांना हे माहितीही नव्हतं. त्यात सगळ्यांना सहभागी करून घेतलं असतं, तर ते अधिक चांगलं दिसलं असतं, असेही शरद पवार यांनी सांगितले.

विरोधकांना निमंत्रण दिले का असा सवाल करताच शरद पवार म्हणाले, सभासदांना नेमकं काय निमंत्रण दिलंय हे मला माहिती नाही. कदाचित माझ्या दिल्लीच्या घरी निमंत्रण पाठवलं असेल तर ते मला माहिती नाही, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, कदाचीत त्यांना तीच भाषा येत असावी आणि ती त्यांना शोभते त्यावर मला काही बोलायचे नाही असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *