Breaking News

नव्या सरकार मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या गाड्यांच्या पेट्रोल-डिझेलचे झाले वांदे पैसेच मिळेनासे झाल्याने १५ दिवसाहून १४ गाड्या बंद

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होवून एक महिना झाला. मात्र राज्याचा गाडा चालविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारच न झाल्याने या सरकारच्या प्रसिध्दीचे काम पाहणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाला आवश्यक तो निधी मिळेनासा झाला. त्यामुळे या विभागाच्या गाड्यांचे पेट्रोल-डिझेलचेही वांदे होवू लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

माहिती व जनसंपर्क विभागाकडे प्रामुख्याने राज्य सरकारमधील मंत्री यांनी घेतलेले निर्णय आणि योजनांची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तर कधी थेट स्वरूपातून पोहोचविण्याची काम केले जाते. तसेच या विभागाकडून मंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांना आणि बैठकांना उपस्थित राहून त्यात झालेल्या निर्णयाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांना जावे लागते. मात्र राज्यात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोनच पदांवर नेमणूका करण्यात आले आहेत. बाकिच्या मंत्रिमंडळाचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे माहिती जनसंपर्क विभागाच्या गाड्यांना पेट्रोल-डिझेलला पैसे मिळणे बंद झाल्याचे या विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गाड्यांना लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलसाठी पैसे मागायला ड्रायव्हर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेले की, वित्त विभागाकडून निधी आलेला नाही. त्यामुळे गाड्यांना पेट्रोल-डिझेलसाठी पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात येत आहे. तर अधिकाऱ्यांनीही पेट्रोल-डिझेलसाठी पैसे मागितले तर त्यांनाही हेच उत्तर देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

अपवाद फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी शासकिय जनसंपर्क अधिकाऱ्यांसाठी लागणाऱ्या वाहनांसाठी फक्त पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर तसेच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कायमस्वरूपी ठेवण्यात येणाऱ्या जनसंपर्क विभागाच्या वाहनाला पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा आयएएस अधिकारी दिपक कपूर, दोन संचालक आणि एक उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना विभागाकडून वाहने देण्यात आली आहेत. मात्र या वाहनांसाठी लागणारे पेट्रोल-डिझेल स्वतःच्या खिशातून सध्या भरत आहेत. तसेच ज्यांना शक्य नाही त्यांना गाड्या वापरू नका असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे या विभागाच्या १४ चारचाकी गाड्या आणि २ दोन चाकी गाड्या आणि त्यावरील कर्मचारी सध्या बसून असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिपक कपूर आणि या पदाचा कार्यभार असलेले उपसंचालकांना प्रत्यक्ष भेटून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता हे दोघेही मंत्रालयात आले नसल्याचे सांगितल्याने यांच्याशई संपर्क होवू शकला नाही.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *