Breaking News

नाना पाटेकर यांनी सांगितला हसन मुश्रीफ यांचा मॉडेलिंगचा किस्सा मर्फी रेडिओची जाहिरात मुश्रीफांनी केली

हसन (मुश्रीफ) चा चेहरा अरे खरं सांगतोय फारच गोंडस आहे. नेहमी हसमुख असतो. त्याच नाव त्याला शोभून दिसतं असे प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगत म्हणाले की, तुम्हाला माहित आहे का? पूर्वी मर्फी नावाच्या रेडिओची एक जाहिरात येत असे त्या जाहिरातीत हनुवटीला एक बोट लावून लहान मुलगा असायचा तो दुसरा तिसरा कोणी नसून तो लहान मुलगा म्हणजे हसन मुश्रीफ आहे असा किस्सा सांगताच एकच हशा उसळला. अरे मस्करी नाही करत मी खरे तेच सांगतोय असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

कागल मध्ये चार महापुरूषांच्या पुतळ्याचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडल्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, धैयर्शिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकांनी एखाद्या व्यक्तीवर इतकं प्रेम करावं हे सांगायला वेगळ्या गोष्टीची गरज नाही. पण हा माणूस पण गेली २५ वर्षे जनतेसाठी सगळं करतोय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. हे पुतळे उभे केले म्हणजे आपली जबाबदारी आणखी वाढते. हे नुसते पुतळे नसतात तर ते विचार असतात. ते विचारांचे पुतळे आपल्या आतमध्ये असावे लागतात. विचार असतील तर त्या विचारानुसार एखाद्या गोष्टींची निर्मिती होते असे ते म्हणाले.

खरं तर आता एकाच माणसाने किती दिवस एकाच ठिकाणी रहावं, गेल्या २५ वर्षांपासून मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हटलं तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, असेही अशी अपेक्षा व्यक्त करत नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना थेट अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ऑफर दिली. तुम्ही अभिनय क्षेत्रात या, मी राजकारणात येतो. मी नक्कीच निवडूण येईन असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा उसळला.

या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर यांचा मुक्काम जवळच्या एका हॉटेलमध्ये करण्यात आला होता. हसन मुश्रीफ यांना याबाबतची माहिती समजताच ते स्वत: नाना पाटेकर यांच्याकडे गेले. मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच नाना पाटेकर हे खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांची गळाभेट घेतली.

यावेळी नाना पाटेकर मुश्रीफ यांना म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो’. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ‘असं कसं? पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करणं हे आम्हा कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत’. यावेळी नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांचा एकेरी केलेला उल्लेख पाहून सर्वजण चकित झाले.

त्यावर नाना म्हणाले, हसन हा माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन..हसन असे म्हणत निघालो. या घाईत मी माझी गाडी दुसऱ्याला धडकली होती असा एक किस्साही त्यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *