Breaking News

देश लॉक डाउन असताना साखर कारखाने सुरु कसे ? ऊसतोड कामगारही माणसेच आहेत गुलाम नाहीत

प्रतिनिधी : बीड

संपुर्ण देश लॉक डाऊन असताना राज्यातील आणि कर्नाटकातील साखर कारखाने चालू राहतातच कशी ?  ऊसतोड कामगारही माणसेच आहेत . गुलाम नाहीत.   त्यांना गुलामप्रमाणे वागवू नका. ते रोज नव्या गांवात नव्या ठिकाणी समूहाने काम करतात .  त्यांनाही कोरोना होऊ शकतो , त्यांच्या आरोग्याशी . खेळ सुरू ठेवणारे  सर्व साखर कारखाने  बंद करून या कामगारांना त्यांच्या स्वगृही सुरक्षित जाऊद्या अशी मागणी शांतिवन चे सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे यांनी सरकारकडे केली आहे.

एकीकडे जगभर कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. सर्व आस्थापना बंद केल्या गेल्या आहेत, शासकीय कार्यालयातही कमी संख्येने कर्मचारी येत आहेत.मात्र, बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी गेलेले लाखो कामगार अद्यापही फडावर काम  करत आहेत. कर्नाटक ,पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने अद्याप सुरु असल्याने या कामगारांना कारखान्यांनी काम सोडून जाण्यास मज्जाव केला आहे. कामगारांच्या मुकादम, टोळी प्रमुखांना काम सोडल्यास कमीशन, अग्रीम रक्कम न देण्याची धमकीच पत्रातून काही कारखान्यांनी दिली आहे. ऊसतोड कामगारही माणसेच आहेत गुलाम नाहीत .  त्यांनाही कोरोना होऊ शकतो . संपूर्ण देश लॉक डाउन असताना साखर कारखाने चालू राहतातच कशी..? असा सवाल त्यांनी केला.

बीड जिल्हा आणि परिसरातून साडेतीन ते चार लाख ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जात असतो. यंदाही लाखो मजूर कारखान्यावर गेलेले आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मोठी दहशत असताना महानगरे रिकामी होत असून नागरिक मुळ गावी परतत आहेत. देश लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची सुरक्षा महत्वाची असून कारखान्यांनी मात्र त्यांना गावी परतण्यास मज्जाव केला आहे. आरोग्याच्या कुठल्याही सुविधा कारखान्यांनी त्यांना पुरवलेल्या नाहीत. एकावेळी अनेकजण एकत्र येत आज इथे तर उद्या तिथे करीत हे कामगार उसतोडणीचे काम करीत असतात . त्यांना संसर्गजन्य असणाऱ्या कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती अधिक आहे .आधीच कुठल्याही भौतिक सुविधाअभावी ऊसतोड कामगार ऊसतोडणीचे काम करत असतात त्यात अशा आजारात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारखाना या कामगारांना गुलामाप्रमाणे  वागवीत असून काम सोडून गेल्यास झालेल्या कामाचे पैसे न देण्याच्या धमक्या देत आहेत . हे अमानुष असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

अनेक कामगार हे आपली मुले, वृद्ध आई, वडील यांना गावी ठेऊन ऊसतोडणीसाठी जातात. मुलांना हंगामी वसतीगृहांचा आधार असतो मात्र, शाळांना सुट्या असल्याने अनेक ठिकाणी हंगामी वसतिगृह बंद केले गेले आहेत. मजुरांचा जीव त्यांच्या चिमुकल्यांकडे लागला आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे गावी कुणीही नाही. कारखान्यांनी मात्र, माणुसकी सोडून दिल्याचे चित्र असून ऊसतोडणीचे काम सोडून गेल्यास मजूरी न देण्याची धमकी देणे सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला.

कामगार माणसे नाहीत का?

खासगी आस्थापनांनी काम बंद ठेवावे,हातावर पोट असणा-यांचे, कंत्राटी कामगारांचे या कळातींल वेतन बंद करु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र,  साखर कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ऊसतोड कामगारांची पिळवणूक नवी नाही मात्र जागतिक महामारिच्या या काळात तरी त्यांना कुटुंबियांकडे पाठवावे अशी मागणीही त्यांनी केली.

——-

हातात कोयता, लक्ष घराकडे

कोरोनामुळे घर सोडू नका असे वारंवार सांगितले जात आहे लाखो कामगारांचे चित्त त्यांच्या चिल्यापिल्यांकडे लागले आहे. लाॅक डाउन मध्ये मुलांना अन्नपाणी मिळत असेल का? , ते आरोग्याची काळजी घेत असतील का? , हंगामी वसतिगृहातून जेवण बंद केल्यावर मुले काय खात असतील असे एक ना अनेक प्रश्न ऊसतोड कामगारांच्या मनात काहूर उठवत आहेत.

—-

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *