Breaking News

वादग्रस्त मंत्र्याकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे म्हाडा सचिव बास्टेवाड ओएसडी म्हणून रूजू

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही वर्षापासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपामुळे सतत चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्याकडील बरेचसे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले म्हाडाचे माजी सचिव भरत बास्टेवाड यांची ओएसडी अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने मंत्रालयात चर्चेत उधाण आले आहे.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊड आणि बोरीवलीतील येथील समता नगर झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पात विशेष मेहेर नजर दाखविल्याचा आल्याचा आरोप विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानुसार महेता यांची चौकशी सुरु असल्याने त्यांच्याकडील अनेक अधिकार मुख्यमंत्र्यांनी काढून घेतले.

त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या एका विशेष कार्य अधिकाऱ्याने पद सोडत दुसऱ्या विभागात जाणे पसंत केले. यामुळे महेता यांनी दुसरा विशेष कार्य अधिकारी शोधण्याची मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे महेता यांनाही म्हाडा मध्ये वादग्रस्त ठरलेले सचिव भरत बास्टेवाड यांचीच कार्यशैली आवडल्याने त्यांना या पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षात म्हाडामध्ये झालेल्या बदल्यांमध्ये बास्टेवाड यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याची चर्चा असून त्याविरोधात गृहनिर्माण विभाग, लोकायुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक तक्रारी या म्हाडातीलच अभियंते, क्लार्क यांनी केलेल्या आहेत. या तक्रारींची साधी दखल घेण्याची तसदी घेण्याची गरज गृहनिर्माण विभागाला वाटली नाही. त्याचबरोबर अनेक विकासकांनीही बास्टेवाड यांच्याबाबत तक्रारी करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे वादग्रस्त गृहनिर्माण मंत्री महेता यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भरत बास्टेवाड यांची नियुक्ती केल्याने सर्वांच्या भुवया चांगल्याच उचविल्या आहेत.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *