Breaking News

पत्रकारतेत असूनही फायदे नाकारणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवेंना अभिवादन कॉ.सुबोध मोरे यांचा खास लेख

आज सकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीले लढवय्या पत्रकार दिनू रणदिवे यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिनू रणदिवे महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त वृत्त संपादक होते. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या”कॉमन मॅन ” चे ते खरे प्रतिनिधी होते. मुंबई- महाराष्ट्रात झालेल्या स्वातंत्र्यपूर्व व स्वतंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या सर्व चळवळींचे ते साक्षीदार होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आचार्य अत्रे, कॉ.डांगे यांच्या सोबत तुरुंगवासही भोगला होता. त्यांचा सत्ताधारी मंत्र्यांपासून ते चळवळीतल्या कार्यकर्त्यां सोबत त्यांचा जैव संबंध होता.धडपडणार्या कार्यकर्त्यां बाबत त्यांना अधिक सहानुभूती असल्याचे आम्हाला अनेकदा जाणवे..स्वत:ची आर्थिक स्थिती विशेष चांगली नसतानाही ते जमेल ती देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत असत. नव्या पत्रकारांना ते सतत प्रोत्साहित करीत असत. त्यांच्यासाठी ते राजकारण, समाजकारणातील ते हक्काचा संदर्भ कोष होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार कसे अभ्यासु असतं, ते सरकारला कसे धारेवर धरीत व अडचणीत आणीत यांचे अनेक किस्से, आठवणी ते आवर्जून सांगत. मुंबई महापालिकेत जॉर्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, सोहनसिंग कोहली, कॉ.अहिल्या रांगणेकर,कॉ.तारा व. कॉ. जी.एल.रेड्डी, कॉ.पी.के.कुरणे, कॉ.मणिशंकर कवठे, वामनराव पगारे,आर.जी.खरात हे कसे सर्व सामान्य लोकांचे, झोपडपट्टीवासियांचे प्रश्र्न लावून धरायचे याच्या अनेक आठवणी ते सांगत. याच काळात रिपब्लिकन पक्षाचे विधानसभेतील नेते बी.सी.कांबळे यांनीही मोरारजी देसाईं सरकारला कायदेशीर अभ्यासाच्या जोरावर कसे कोंडीत पकडून हुतात्मा चौकातील गोळीबारात शहीद झालेल्याचा खरा आकडा सरकारला जाहीर करणे कसे भाग पाडले, याच चळवळीत आंदोलन उग्र असताना हिंसक जमावाला दादर स्टेशन बाहेर समाजवादी नेते एस.एम.जोशींनी आपला जीव धोक्यात घालून कसे शांत केले आणि एका पोलिस अधिकाऱ्याला जीवदान दिले याचा आंखो देखा हाल ते ऐकवीत.
दिनू रणदिवे पत्रकारीतेत वरीष्ठ स्थानावर असूनही त्यांनी पदाचा व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी उपयोग केला नाही. महाराष्ट्रातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री त्यांना सरकारी कोट्यातील चांगले घर सन्मानाने देत होते. पण या स्वाभिमानी पत्रकारांने ते घरही नम्रपणे नाकारले व आपल्या दादरच्या लहान घरातच राहणं पसंद केले. जेव्हा मृणाल गोरे, बाबुराव सामंतांनी गोरेगावात गरीबांच्या घरांसाठी नागरी निवारा प्रकल्प उभा केला, त्यात ते सभासद झाले होते. आणि रीतसर त्यांचा क्रमांक लागल्याने त्यांना पैसे भरून घरही मिळाले होते. परंतु वरच्या मजल्यावरील घर तळमजल्यावर बदलून मिळावे म्हणून मृणाल गोरे यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रमूख पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. पण संबंधितांनी ते बदलून न दिल्याने ते त्या घरात राहायला अखेरपर्यंत जाऊ शकले नाही ही खंत त्यांना शेवटपर्यंत होती व ती त्यांनी काही वर्षांपूर्वी माझ्या कडे बोलूनही दाखवली. दिनू रणदिवे व बाळ ठाकरे हे बालपणी दादरला एकाच शाळेत शिकत होते व मित्रही होते. पण त्यांनी शिवसेनेच्या चुकीच्या राजकारणाबाबत मत मांडताना कधी कच खाल्ली नाही. आपलं महानगर” सांय दैनिकावर जेव्हा शिवसैनिकांनी हल्ला केला तेव्हा त्या विरोधात शिवसेना भवनासमोर जी निषेध निदर्शने झाली त्यातही ते निषेध करण्यात पुढे होते. मुंबईत होणा-या शोषित, कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या, विस्थापितांच्या, गरीबांच्या सर्व चळवळींचे ते कृतिशील समर्थक होते. वरील सर्वांच्या समस्यांवर त्यांनी वृतपत्राद्वारे तोंड फोडण्याचा प्रयत्न केला. सत्तर-ऐंशीच्या दशकात सुप्रसिद्ध लेखक अरुण साधू यांनी “मुंबई दिनांक” व सिंहासन या कादंबऱ्या प्रकाशित केल्या. आणि त्यावर आधारित सिंहासन हा चित्रपट डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला. ज्यात निळू फुले यांनी केलेली दिगू रणदिवे या प्रमूख पत्रकार पात्राची भूमिका खूप गाजली होती. जी वास्तवातील दिनू रणदिवे यांचीच होती हे सर्वश्रुत होते. आजच्या बाजारु,कॉर्पोरेट, सत्ताधाऱ्यांची उघड भाटगीरी करणाऱ्या काळात ध्येयवादी, पत्रकारीतेच्या दिपस्तंभ लयाला जाते हे दु:खदच, परंतु दिनू रणदिवेंकडून प्रेरणा घेतलेले तरुण पत्रकार जोपर्यंत कार्यरत आहेत तोपर्यंत रणदिवेंचे विस्मरण होणे शक्य नाही, अशा या सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या ध्येयवादी पिढीच्या जेष्ठ पत्रकाराला माझे विनम्र अभिवादन.!

सुबोध मोरे , मुंबई.
संपर्क,९८१९९९६०२९

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *