Breaking News

राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर बंदी ? आगामी अधिवेशनात कायदा आणण्याच्या हालचाली

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील बहुतांष जिल्ह्यात हुक्का पार्लरची केंद्रे सुरु आहेत. त्यामुळे राज्याची तरूण पिढी बरबाद आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने या सर्वच हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच पार्लरवर बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने हुक्का पार्लरवर बंदी घालण्यावर असमर्थता दर्शविल्यानंतर याविषयीचा कायदा आणण्याबाबतच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पार्लरच्या नावाखाली अनेक ठिकाणी ड्रग्ज, गांजा यांचे अवैधपणे विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. त्यामुळे अनेक तरूण युवक-युवती याच्या अधीन होत असल्याने पार्लरवरच बंदी घालण्याबाबत एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीत मुंबईत एखादा पार्लर सुरु करायचा असेल तर त्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून दिले जाते. त्याच धर्तीनुसार इतर महापालिकांमध्ये परवानगी दिली जाते. त्यामुळे या हुक्का पार्लरवर कोणतेही नियंत्रण सरकारचे नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हुक्का पार्लर अवैधपणे चालविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यांच्यावर कोणत्याही पध्दतीची ठोस कारवाई करता येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मागील आठवड्यात या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत पार्लरवर बंदी घालण्याच्या कायद्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दाखविली असून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच यावर विधी व न्याय विभागाचा अभिप्रायही मागण्यात येणार असून त्यांचा अभिप्राय आल्यानंतर कायद्याचा मसुदा तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीसाठी पाठवला जाणार आहे. त्यास एकदा संमती मिळाली की अर्थसंकल्पिय अधिवेशनात किंवा पावसाळी अधिवेशनात याविषयीचे विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *