Breaking News

दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स, बिस्कीट, दूध पॉकेट, कपडे, चादर-बेड शीट, सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाठवावयाचे असल्यास माणगाव येथील पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित अधिकारी :- 1) मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड – 9965100800. 2) प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगाव – 7588816292, 3) प्रियांका आयरे-कांबळे, तहसिलदार, माणगाव – 8805160570, 4) परमेश्वर खरोडे, अव्वल कारकून, माणगाव तहसील – 9028585985, 9804546546,

या सर्व वस्तू तहसील कार्यालय, माणगाव पर्यंत पोहोच होतील, याची दक्षता घेण्यात येण्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. महाड तालुक्यातील आकले भोराव मध्ये जीवितहानी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत. परंतु अंदाजे २० गुरे वाहून गेलीत. नुकसान जास्त झाले आहे, कपडे,अन्नधान्य काहीच राहिले नाही.

महाड तालुक्यातील तळई गावामध्ये काल रात्री दरड कोसळली 

आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने  बचावकार्याला सुरुवात झाली.  आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून ३६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी ३० ते ४० जण या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दरडीखाली ३० ते ३५ घरे दबल्याची भीती होती. मात्र पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिकांच्या व एनडीआरएफ च्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले. कर्जत तालुक्यातील कोंडिवडे-पशुवैद्यकीय दवाखाना-2 यांच्या कार्यक्षेत्रातील सांगवी गावातील ४ खेचर, १७ बकऱ्या २ वासरु, पाण्यात बूडून मृत्यूमुखी पडले आहेत.

पोलादपूरातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन दरडीखाली ११ जणांचा मृत्यू १३ जखमींवर उपचार सुरु

पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली आहेत.

या ठिकाणी बचावकार्य सुरु असून, केवनाळे येथील ६ जणांचा तर गोवेले सुतारवाडी येथे ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री ही घटना कळल्यानंतर प्रशासनाने तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी आढावा घेतला असता कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेल्याचे दिसून आले. याखेरीज, साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे प्रशासनास शक्य झाले नव्हते. मात्र स्थानिकांच्या मदतीने सकाळी बचावकार्याला सुरुवात झाली. यावेळी दरडीच्या ढिगाऱ्याखालून केवनाळे येथून ६ जणांचे तर गोवेले सुतारवाडी येथील ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर गोवेले सुतारवाडी येथील १०, केवनाळे येथील २ आणि कुंभार्डे येथील १ अशा १३ जखमींना बाहेर काढण्यात आले असून, या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाड-पोलादपूर येथील पूरबाधितांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तत्पर

सतत चालू असलेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसात महाड येथे पूरस्थिती/ अतिवृष्टी झालेली आहे. गुरुवार, २२ जुलै, २०२१ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता तळीये गाव (वरची वाडी) ता.महाड येथे अचानक दरड कोसळल्याने जवळपास ३० घरे ढिगाऱ्याखाली गेली असून आज २३ जुलै रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तसेच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे -सुतारवाडी,ता.पोलादपूर गावातील ५ मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. अशा एकूण ३७ मृतदेहांचे शवविच्छेदन जागेवरच (Spot Post Mortem) करण्यात येणार आहेत. यानंतरही अजूनही काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असून शोधकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच महाडमध्ये ७ ते ८ फूटावर खूप उंचीवर पाणी साचलेले असून अद्यापही जखमी रुग्ण सापडलेले नाहीत व उंच ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.

एमआयडीसी बिरवाडी, महाड येथे दोन कंपन्यांमध्ये स्फोट होवून आग लागल्याची घटना घडली होती परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आलेले आहे.

तसेच मागील २ दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असल्याने महाड येथील खाजगी व शासकीय डॉक्टर्स यांच्याशी  संपर्क होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  त्याचप्रमाणे महाड येथील कोविड सेंटर (सीसीसी / डिसीएचसी) सेंटरमधील रुग्ण सुरक्षित असून जिल्हा स्तरावरुन व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथून औषधांचा व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक औषधोपचारही सुरु आहेत. उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे ३७ रक्तपिशव्या उपलब्ध असून ५० रक्तपिशव्यांची अलिबाग जिल्हा रुग्णालय येथून मागणी करण्यात आली आहे.

गंभीर जखमी रुग्णांना (Poly Trama) एम.जी.एम. कामोठे, जिल्हा रुग्णालय अलिबाग व गरज भासल्यास जे.जे. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. स्थिर व किरकोळ जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव व जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी संस्थेमार्फत गरजूंना पाणी, जेवणाची पाकीटे व औषधांचा पुरवठा करण्यात येत असून शवविच्छेदन करण्यासाठी 1) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील तज्ञपथक (न्यायवैद्यक तज्ञ) डॉक्टरांसह 2) उपजिल्हा रुग्णालय, म्हसळा, 3) उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन, 4) उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे चार वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांनी महाड येथे पाहणी करून जखमींची विचारपूस करून सर्व संबंधीत विभागांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.

तसेच वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत संपर्कासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य हेल्पलाईन नं. 02140-263006/263003, डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधीक्षक (नोडल ऑफिसर) मो.नं.9130733202/8369424489, सनियंत्रण अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अलिबाग रायगड मो.नं. 9404001000 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *