Breaking News

कोविड आणि मी…. आजारातून बरे झालेले मंत्रालयातील अधिकारी सांगतायत आपबीती खास मराठी e-बातम्याच्या वाचकांसाठी

मेरा मुझमे कुछ नही, जो कुछ है ये तेरा ।
तेरा तुझको सौप दे, क्या लागे है मेरा ।।
…संत कबीर

साधारण: जानेवारी महिन्यामध्ये माझ्या मित्रांसोबत एका डिनरवेळी कोविड संदर्भाने चर्चा झाली होती. त्यावेळी चीनच्या वुहान प्रांतात या रोगाने पूर्ण धुमाकुळ घातला होता. कालौघात त्याने अमेरिका, युरोप सारख्या वैद्यकिय प्रगत असलेल्या राष्ट्रांमध्ये अक्षरश: दहशत माजवली. यावेळी आपल्या देशात, राज्यात कोविडचा प्रसार संथगतीने का होईना पण होत होता. अशावेळी, आपल्याला कोविड होईल अथवा होवू शकतो हे मात्र एकदम अविश्वसनीय वाटत होत. याच कारण म्हणजे आपण सर्व नियम/पथ्ये उदा. फिजीकल डिस्टंसिंग, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा पर्याप्त वापर करणे इ. चे पालन करणे या बाबींवर भर दिला होता, यांवर एक प्रकारचा विश्वास होता.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस मला घसा खवखवणे व सर्दी सदृश्य लक्षणे दिसून आल्याने मी तत्काळ लक्ष दिले व संध्याकाळ पर्यंत ही लक्षणे नाहिशी झाली व बरं वाटलं. मात्र, दुसऱ्या दिवशीच सकाळी उठल्यापासून डोक दुखायला सुरूवात झाली व संध्याकाळी सौम्य ताप जाणवू लागला. आता, मात्र मला वेगळी किंबहुना आपण आजारी पडतो आहोत याची शंका मनांत आली. तत्क्षणी मी स्वत:ला कुटूंबापासून विलग केलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने तापावरची गोळी घेतली व प्रतिजैवकं सुरू केली. रात्री मला पुन्हा बरं वाटू लागलं. पुढच्या दिवशी, एक दिवसाच्या अंतराने, संध्याकाळी मात्र ताप वाढला व त्याचक्षणी कोविडची तपासणी करावं असं मनाशी नक्की केलं. यासाठी डॉक्टरांच मात्र आणखी वाट पहाव असं मत होत. पण माझ्या आग्रहाखातर वरळी येथिल कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी केली. अहवाल येण्यास ४८ तासांची वाट पहावी लागणार होती. हाच कालावधी मनाची कणखरता वाढविण्यासाठी मला मिळाला. या दरम्यान तापाचं येण-जाणं सुरूच होत. कोविड असेल की नसेल याबाबत मला आढळून येणारी लक्षणं याआधारे मी इंटरनेटवरून माहिती घेण्यास सुरूवात केली. असं असल तरी ते केवळ आपल्या समाधानासाठी होतं. प्रत्यक्षात तपासणी अहवाल हेच अंतिम सत्य होतं.
कोविड केअर सेंटर मधून मला डॉक्टरांचा फोन आला आणि माझ्या प्रकृतीची विचारपूस त्यांनी केली व शेवटी त्यांनी माझा अहवाल पॉझीटिव्ह असल्याचे सांगितलं. याक्षणी माझ्या मनातील चल-बिचल, रोगाचं निदान झाल्याने, पूर्णपणे थांबली. डॉक्टरांनी सकारात्मक राहण्याचा व न घाबरण्याचा सल्ला मला दिला. आपल्यापासून घरच्यांना संसर्ग होवू नये म्हणून मी रूग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला व संध्याकाळी दाखल झालो. रूग्णालय जरी नामांकित असले तरी तेथिल व्यवस्था मात्र यथास्थितीच होती. मात्र डॉक्टरांकडून रूग्णांवर पूर्ण लक्ष असल्याचे याकाळात दिसून आले. रूगणालयात दाखल होण्यापूर्वी मी घरी स्वत:ला पूर्णत: विलग केलं. यामध्ये पत्नीची भूमिका खूप मोलाची ठरली. घरी असताना पूर्ण अंतर ठेवणे, मास्कचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे इ. उपाय कडकपणे अवलंबिल्याने माझ्या पत्नीचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला व माझ्यासह सर्वांचा जीव भांड्यात पडला. याठिकाणी मी आवर्जून नमूद करतो की, वेळीच चाचणी करण्याचा व लक्षणे दिसताच स्वत:ला विलग केल्यामुळे माझ्यापासून कोणालाही संसर्ग झाला नाही. त्यामुळे कोणीही चाचणी करण्यास घाबरू नये.
रूग्णालयात दाखल झाल्यानंतर सुरूवातीच्या काळात ताप येण्याव्यतिरिक्त अन्य त्रास झाला नाही. या रोगावर विशिष्ट असे औषध नसल्याने नेमकं कोणतं औषध आपल्याला लागू पडेल याबाबत प्रत्येक रूगणाप्रमाणे माझ्यासाठी देखील एक प्रश्नचिन्ह होत. हायड्रॉक्सी क्लोरोक्विन, मल्टिव्हीटॅमिन, ‘क’ जीवनसत्व असणारी गोळी व तापावरची गोळी असं साधारण सात दिवस औषध सुरू होतं. सुरूवातीच्या टप्प्यात ताप उतरत नसल्याने हे औषध आपल्याला लागू पडत नाही कि काय? अशी शंका मनांत येवून गेली. नेमकं अशा प्रसंगी आपला धीर खचू शकतो. अशावेळी मन पूर्णपणे खंबीर करून सकारात्मक राहणे आवश्यक होतं. या दरम्यान औषधांच्या प्रभावामुळे जीभेची चव गेली होती. त्यामुळे जेवणावर परिणाम झाला. पण प्रतिकारक्षमता राखण्यासाठी पुरेस जेवण करणे आवश्यक होत. यावेळी जेवणाबरोबरच विशेषकरून: ‘क’ जीवनसत्व वर्गीय फळे घेतल्याने त्याचा समतोल राखता आला. याशिवाय सतत गुळण्या करणे, किमान ४ ते ५ लिटर कोमट पाणी पिणे, ग्रीन टी इ. चा चांगला परिणाम दिसून आला. तब्बल ५ दिवसानंतर माझा ताप पूर्णपणे निवळला. मात्र एक दिवस सकाळी थोडं हलकासा व्यायाम करताना मला श्वसनाचा त्रास झाला. वास्तविक ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे लक्षात आले. यासाठी डॉक्टरांनी छातीचा क्ष-किरण घेतला यावरून या विषाणूने काही अंशी माझ्या फुफुसांची क्षति केली असल्याचे दिसून आले. मात्र, ताप पूर्णपणे थांबला असल्याने पुढच्या तीन दिवसांत माझी तब्येत पूर्णत: सुधारली. परिणामी, रूग्णालयात एकूण अकरा दिवसांच्या उपचारानंतर माझी कोविड चाचणी निगेटिव्ह आली व सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सर्व काळात माझ्या घरचे सर्व जण, अनेक मित्र, शेजारी, कार्यालयातील सहकारी यांनी या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मला खूप धीर दिला.
रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी वर्ग हा अहोरात्र पिपिई किट मध्ये काम करत आहे. त्यांचे हे कौशल्य व सेवाभावी वृत्ती अत्यंत कौतुकास्पदच आहे. यामध्ये त्यांच्या आरोग्यास देखील धोका आहे. पण हे जाणून देखील ते आपली सेवा चोखपणे बजावतात. अर्थात, खाजगी रुग्णालयाकडून रूग्णाचा खिसा अगदी व्यवस्थितपणे, भरमसाठ व अनावश्यक शुल्क आकारून, रिकामा करण्यात येतो हा डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या मेहनती वर पाणी टाकणारा व नोबेल प्रोफेशन मानण्यात येणाऱ्या वैद्यकिय क्षेत्रासाठी चिंतनाचा विषय नक्कीच आहे.
रुग्णालयातील सुमारे अकरा दिवस व त्यापूर्विचे चार-पाच दिवस असा एकूण पंधरवाडा हा मनाची कणखरता दृढ करण्याबरोबरच, सकारात्मक विचार करणे व प्रतिकारक्षमतेची कसोटी पाहणारे क्षण ठरले. या रोगाचा एकूणच होणारा प्रसार व अनेक तज्ञांची मते पाहता आता आपल्याला याच्या सोबत जगावं लागणार आहे, असे दिसून येते. यासाठी आपल्या जिवनशैलीत सकारात्मक बदल करून, उदा. मास्कचा नियमीत वापर करणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर ठेवणे, कोमट पाणी पिणे, गुळण्या करणे, प्राणायाम करणे, ‘क’ जीवनसत्व नियमीत घेणे इ., आपली प्रतिकारक्षमता अधिक बळकट करण्याबरोबरच मानसिक कणखरता वाढविण्याखेरिज पर्याय नाही, हे निश्चित. कोरोना अर्थातच कोविड ला न घाबरता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी आपल्याला हे करावचं लागेल. चला, उठा तर, नविन सकारात्मक जीवनशैली अंगिकारण्यासाठी सुरूवात करूया !
आपला,
युवराज अजेटराव,
वरळी,
मुंबई.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *