Breaking News

दुष्काळ हटविण्यासाठी रिक्षा चालकाचा असाही प्रयत्न दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत

मुंबई : प्रतिनिधी
दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य असेल तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे.
आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना माने म्हणाले, वेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते, तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतात, आम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखं वाटतं. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो. लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात.
आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटे, कधी अर्धा तास तर कधी एक तास बसतात. मग मी त्यांना कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो, याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुलं, रंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान ऊंचीची १० रोपं बांधून घेतली. यात पांढरं तगर आहे, जास्वंद आहे, तुळस आहे, मनी प्लांट आहे, कडिपत्त्याचं रोपं आहे आणि इतर ही रोपं आहेत.
माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुलं आहेत माने सांगत होते, त्यांना सगळ्यांना झाडं लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा, दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच. त्यातून ही कल्पना सूचली.
लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नलला थांबलं तर लोक रिक्षा जवळ येऊन “सेल्फी” काढतात, गाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने “खूप सुंदर” असं सांगतात. एवढच कशाला रिक्षात बसणारे लोक झाडासाठी म्हणजे रोपासाठी पैसे देतात म्हणतात, आमच्या नावानं रिक्षात एक रोप लावा. कालच एका प्रवाशाने ५० रुपये काढून दिले म्हणाले, आणखी एखादं चांगलं रोप विकत घ्या आणि रिक्षाला लावा अशी ही माझी रिक्षा सबसे निराली है, माझी वृ(रि)क्षा राणी आहे, जी वृक्ष लागवडीचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देते लोकांना आनंद होतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंदी होतो.
रिक्षाचालक प्रकाश माने वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत- सुधीर मुनगंटीवार
पोटापाण्यासाठी लोक विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय करतात. पण हे करत असतांना सामाजिक भान जपून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे, हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *