Breaking News

डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : दलित-आदीवासींना जोडणारा एक डॉ. आंबेडकरी विचार धागा डॉ. संजय दाभाडे एक समर्पक कार्यकर्ता

समाज परिवर्तनाच्या आणि जाती अताच्या लढाईमध्ये विविध विचारधारा, मतप्रवाह आणि कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी संघर्षाची बीजे रोवली आणि पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी  त्यात मोलाची भर घातली.

आंबेडकरी चळवळ असो वा समाजवादी किंवा डावी भूमिका घेऊन लढ्यात उतरलेलेल्या व्यक्ती असो, संघर्षाला अनेक फाटे फुटल्यावर त्याची धार बोथट होतेच आणि या साऱ्या चळवळींमध्ये सुसूत्रता किंवा ताळमेळ नसेल तर विघातक शक्ती यात शिरकाव करून ती आतून पोखरून टाकायचा धोका नेहमीच असतो. अशा परिस्थितीत सारे गट- तट, विचारधारा आणि कार्यकर्ते याना एकत्र आणून आपले अंतिम ध्येय हे प्रस्थापित ‘मनुवादी’ संस्कृती उखडून टाकण्याचे आहे, ना कि आपापसात भांडण्याचे, अशी  सातत्याने गेली २० वर्षे भूमिका घेऊन समाजातील तळागाळातील कष्टकरी जनतेत काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या पुण्याच्या डॉक्टर संजय दाभाडे सारख्या कार्यकर्त्यांची खरी गरज समाजाला आहे.

ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमात ठरवलेल्या पारधी समाजातील या तरुणाने , पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरकीची डिग्री घेतली, आदिवासी – आंबेडकरी चळवळ कशी एकत्र आणली पाहिजे अशी भूमिका समाजात ठामपणे मांडली व आरक्षण हक्क समिती किंवा नुकतेच खर्डा मार्च आयोजित केलेले दलित- आदिवासी अधिकार आंदोलन स्थापन केले ; आंबेडकरी, कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळींना एकत्र एका मंचावर आणून दाखवले आणि आता ‘रयत भवन’ स्थापन करून पुण्याच्या विश्रांतवाडी मध्ये कष्टकरी जनतेला मोफत उपचार, मुलांसाठी जीवन शाळा आणि कौटुंबिक हिंसाचारा विरोधात केंद्र उभारले.

हे सारे अचानक घडले नाहीच किंवा कोणी दानशूर पैसे ओतायलाही आला नाही. किंबहुना संजयचे विचार ऐकल्यावर पैसेवाले त्यांना फार जवळ करतील याची शक्यताच नाही. हे घडले सततच्या संघर्षातून, पारधी म्हणून त्यांच्यावर झालेल्या अपमानातून आणि आंबेडकरी विचारांच्या जबरदस्त प्रभावाने.

आपल्या चार भावंडासह संजय यांच्या आजोबाना ब्रिटिश पोलिसांनी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती. गुन्हा कसला किंवा खरे आहे कि नाही याचा काही संबध नव्हता. कारण हे सारे पारधी समाजातील होते. अनेक विनवण्या करून, घरातील एका मुलाला तरी सोडा अशी आर्जवे केल्यावर पोलिसांनी आजोबाना सोडले. जळगाव – नंदुरबारच्या सीमेवरील एका छोट्या खेड्यात ‘सालदारकी करीत सुगराम दाभाडे आपल्या कुटुंबासह राहू लागले. काही काळात त्याना जमिनीचा एक तुकडा मिळाला आणि तो त्यांच्यातील परिवर्तनाची सुरुवात ठरला. अशिक्षितपणा हे मागासलेपणाचे कारण आहे, हे त्यांना समजले होते. गाडगे महाराजांपासून प्रेरणा घेत त्यांनी आपली तीन मुले आणि एक मुलगी यांना शिकवले. संजय यांचे वडील आत्माराम दाभाडे राज्यातील पारधी समाजातील पहिले ग्रॅजुएट, काका सीताराम दाभाडे पहिले इंजिनिअर, छोटे काका जळगाव जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती झाले. आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्या मीराबाई पारधी समाजातील सेल्स टॅक्स विभागात पहिल्या क्लास वन अधिकारी बनल्या.

हा इतिहास घेऊन पुण्यात मेडिकल कॉलेजमध्ये गेलेल्या संजय यांना सेवादलाचे मोहन वाडेकर यांच्या रूपात पहिले गाईड मिळाले. दलित पँथर सोबत अंत्यत घनिष्ठ संबन्ध असलेल्या वडेकरांमुळे संजय देखील चर्चा, वाद-विवाद यातून पँथरकडे आणि पर्यायाने आंबेडकरी विचारांकडे आकर्षित झाले. कॉलेजमध्ये आंबेडकर जयंती साजरा करायला प्राध्यापकांनी विरोध केल्यावर तेथे केले गेलेलं आंदोलन हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन. ‘आमचे कॉलेज आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या सेंट्रल हॉटेल शेजारी होते. तेथील सततच्या चर्चा, उचलले जाणारे मुद्दे, वाद यातून मला डॉ. आंबेडकर कळत गेले, असे दाभाडे सांगतात.

आरक्षणातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टोचून बोलणे, सतत जात दाखवणे, भेदभाव या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होत होताच आणि त्यातूनच वैचारिक जडणघडण होत गेली. ‘मला प्रचंड भीती वाटायची इंग्रजीची. इंफेरीयॉरिटी कॉम्प्लेक्स होता. त्यातून एक भयानक मानसिक संघर्ष चालू होता. आणि कधीतरी हे सोडावे हे देखील वाटायचे, ते सांगतात.

त्यातून आदिवासी आणि आंबेडकरी चळवळ अद्याप एकमेकांपासून दूर असल्याचं तो काळ होता. आदिवासी असून देखील आंबेडकरी विचार मानतो हा शिक्का देखील त्यांच्यावर लागला होता. ‘सध्या परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. पण १९८८ मध्ये या दोन्ही चळवळी अंतर राखून होत्या,’ ते म्हणाले.

त्याचवेळेस दाभाडे यांनी सध्याचे काँग्रेस आमदार के सी पडवी (तेव्हा ते काँग्रेस मध्ये नव्हते ) व वाडेकर यांनी स्थापलेल्या ‘आदिवासी विद्यार्थी संघटनेत’ उडी घेतली. ‘तो काळ आदिवासी अस्मितेच्या सुरुवातीचा होता. मी जय भीम म्हणायचो, इतर आदिवासीना ते विचित्र वाटायचे. त्यामुळे थोडा दुरावाही निर्माण झाला होता. पण माझे काम साऱ्यांना एकत्र जोडण्याचे होते. तेव्हा केले, आत्ता करीत आहे आणि उद्याही करेन,’ असे दाभाडे निर्धारपूर्वक सांगतात.

पुण्यात त्याचवेळेस मंडल आयोगाच्या प्रश्नावरून वारे वाहू लागले होते. ना.ग.गोरे, रामविलास पासवान, अरुण कांबळे, मृणाल गोरे अशी समाजवादी, आंबेडकरवादी व्यक्तीची भाषणे होऊन त्यांचा प्रभाव दाभाडेंवर पडत होता. नर्मदा बचाव आंदोलनात दाभाडे तेव्हा सहभागी झाले ते अगदी २००८ पर्यंत जोडलेले होते.

डॉक्टर झाल्यावर आदिवासी भागात काम करताना दाभाडे यांचा संपर्क कम्युनिस्ट चळवळीशी आला. सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाचे एकमेकांवर असलेले अवलंबित्व अभ्यासता आले आणि त्याचसोबत सर्व परिवर्तनवादी विचारधारा एकत्र असल्या पाहिजेत हा विचारही पक्का होऊ लागला.

२००२ साली दाभाडे यांनी आरक्षण हक्क समितीची स्थापना केली. ओबीसी ना IIT  व IIM  मध्ये आरक्षणाचा मुद्दा उचलून धरण्यात ही समिती आघाडीवर होती. त्याचसोबत सर्व आंबेडकरी प्रवाह, समाजवादी, कम्युनिस्ट या समितीने एकत्र आणले. जवळपास १२ वर्षे हा मंच चालविला.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फी च्या नावाखाली केले जाणारे शोषण महाराष्ट्रात सर्वप्रथम दाभाडे यांच्या वर्तमान पत्रातील लेखांमुळे उघडकीस आले . स्टुडंटन्स फेडरेशन ऑफ इंडिया सोबत दाभाडे यांनी साऱ्या राज्यभर पुस्तिका, लेख आणि व्याख्याने या माध्यमातून वातावरण ढवळून काढले. तेव्हापासून खाजगी महाविद्यालये आणि फी या विषयावर दाभाडे यांनी खोलवर जाऊन काम करण्यास जी सुरुवात केली ती अद्यापही कायम आहे.

‘अर्थात हे सारे करत असताना एक खंत होती कि मी प्राध्यापक म्हणून जरी काम करीत असलो. तरी वस्ती पातळीवर काहीच काम करीत नाही. ग प्र प्रधान मला म्हणाले कि तू डॉक्टर आहेस आणि तुझा रस्ता तूच शोधला पाहिजेस,’ दाभाडे सांगतात.

साधारण २५ लाख रुपये कर्ज काढून दाभाडे यांनी त्यांची डॉक्टर पत्नी संगीता यांच्यासोबत विश्रांतवाडी येथे मोफत दवाखाना सुरु केला. झोपडपट्टी आणि कष्टकरी समाज राहणाऱ्या त्या भागात वैद्यकीय उपचार हि मोठी समस्या आहे. दाभाडे रुग्णाला मोफत तपासणी तर करतातच तर औषधेही मोफत उपलब्ध करून देतात. ‘व्यवसायातील अनेक मित्र यात मदत करतात. टेस्ट करण्यासाठी माझे मित्र पैसे घेत नाहीत किंवा अंत्यत कमी घेतात. खाजगी दवाखान्याच्या जाळ्यातून त्यांना दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो,’ दाभाडे सांगतात.

या ‘रयत भवन’ मध्ये दर शनिवारी ६ वाजता ‘जीवन शाळा’ भरते. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील पहिली ते आठवीची मुले दर आठवड्याला जमतात. त्यातील काही शाळेत शिकतात काही नावापुरती शिकतात. इथे त्यांचे वर्ग भारतात, अभ्यास घेतला जातो, गाणी गायली जातात किंवा अगदी पथनाट्यंही शिकवले जाते. दाभाडे यांच्या मते, जीवन शाळा हा त्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे, त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. याचे परिणामही दाभाडे याना सुखावून जाणारे आहेत. त्यांच्याकडे आलेला एक टारगट मुलगा याच शाळेत येऊन आता तिथल्या नवीन मुलांना शिकवण्या एव्हढा जबाबदार झाला आहे. लवकरच येथे एक मोफत कॉम्प्युटर केंद्र सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. कौटुंबिक हिंसाचारा विरोधात येथे केंद्र चालवले जाते. महिलांना पूर्ण पाठबळ देणे, आवश्यक ती मदत पुरवणे हे काम या केंद्रातून होते.

दलित आणि आदिवासी प्रवाहांना एकत्र जोडून ठेवण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून दाभाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ‘दलित आदिवासी अधिकार आंदोलन’ स्थापन केले. नगर जिल्ह्यातील खर्डा प्रकरणानंतर निघालेला मोर्चा हा त्याचाच एक भाग होता. मात्र तेवढ्यावर मर्यादित न राहता, परिवर्तनवादी चळवळींना तांत्रिक आणि वैचारिक मदत होईल अशा प्रकारचे काम करण्याचे उद्दिष्ट दाभाडे याचे या आंदोलनातून आहे. यामध्ये काही रिपोर्ट्स तयार करणे किंवा सांख्यिकी माहिती जमा करणे किंवा साहित्य तयार करणे असे अनेक प्रकार समाविष्ट आहेत.

‘रस्त्यावर काम केल्यावर समोर येणारे आजचे वास्तव भयानक आहे, अस्वस्थ करणारे आहे. या साऱ्यावर मात करण्यासाठी साऱ्यांनी एकत्र येऊन हे मुद्दे उचलणे हा त्यावरील एकमेव उपाय आहे. जाती अंताची भूमिका घेणाऱ्या साऱ्याच परिवर्तनवादी चळवळी जेव्हा एकत्रित काम करतील तेव्हाच हे उद्दिष्ट प्राप्त होऊ शकेल,” असे दाभाडे सांगतात.

(ज्येष्ठ पत्रकार अलोक देशपांडे- [email protected])

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *