Breaking News

बंगलोर, नाशिक, नगरच्या रस्त्याने जाणाऱ्या मजूरांसाठी आता विश्रांतीगृह आणि सुविधा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ग्रामपंचायचींना आदेश

पुणे: प्रतिनिधी
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना त्यांना विश्रांती त्याचप्रमाणे नाष्टा, जेवण, शौचालय तसेच अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुणे जिल्ह्यातील पुणे-बंगलोर, पुणे- सोलापूर, पुणे-अहमदनगर, पुणे -मुंबई व पुणे-नाशिक या महामार्गावर संबंधित तहसिलदार यांच्याकडील राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने मजुरांची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
देशातील विविध राज्यात, जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, मजूर यांना जिल्ह्यात येण्यासाठी किंवा जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत उन्हाळयाचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना त्यांना विश्रांती त्याचप्रमाणे नाष्टा व जेवण या सर्व बाबी विचारात घेत पुणे जिल्ह्यातील पुणे-बंगलोर, पुणे सोलापूर, पुणे-नगर, पुणे -मुंबई व पुणे-नाशिक या महामार्गावर तहसीलदार यांनी त्यांचेकडील राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने मजूरांची व्यवस्था करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.
या महामार्गावर ठराविक अंतरावर आवश्यकतेप्रमाणे विविध टप्प्यावर उपलब्ध असलेले मंगल कार्यालय, ढाबा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सोय करण्यात यावी तसेच या विश्रांतीगृहाचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीने (विश्रांतीगृह ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत होणार आहे अशा ग्रामपंचायतीने गट विकास अधिकारी यांच्या शिफारशीने तहसिलदार यांचेकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत सादर करावयाचा असून त्यास तहसिलदार यांनी तात्काळ मान्यता द्यावी. प्रस्तावाला मान्यता मिळताच संबंधित ग्रामपंचायतीने उपरोक्त सूचनांप्रमाणे विश्रांतीगृह तात्काळ सुरु करावे. या विश्रांतीगृहात चहा,नाष्टा, भोजन तसेच स्वच्छतागृह व विश्रांतीची सोय करण्यात यावी. या विश्रांतीगृहाच्या ठिकाणी मजूरांना हात धुण्याची सोय, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टसिंग इत्यादीचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. या विश्रांतीगृहाच्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने आवश्यकतेप्रमाणे पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.
विश्रांतीगृहाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मजुराची स्वतंत्र रजिष्टरमध्ये नोंद ठेवावी तसेच संबंधित मजुराचा संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता या बाबी रजिस्टरमध्ये समाविष्ट असणे आवश्यक राहील. याशिवाय विश्रांतीगृहनिहाय, तारीखनिहाय विश्रांतीगृहावरील मजूर उपस्थितीचा दैनंदिन अहवाल संबंधित ग्रामपंचायतीने तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या विश्रांतीगृहांना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी देत या ठिकाणी मजुरांना दर्जेदार सुविधा दिल्या जातील याबाबतची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *