Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आंबेडकर चळवळीचे भवितव्य ? काल आणि आज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचा मुख्य हेतु होता तो सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे. आंबेडकरी चळवळ म्हणजे वर्चस्ववादा विरुध्द उभारण्यात आलेला लढा. हा वर्चस्ववाद सांस्कृतिक होता, सामाजिक होता, राजकीय होता, शैक्षणिक होता, प्रतिष्ठेचा होता. हा वाद वैदिक धर्माने जोपासला असल्यामुळे वेद म्हणजेच भेद हे प्रमेय अस्तित्वात आले होते आणि हे प्रमेय सिध्द करण्याची जबाबदारी अनेक ग्रंथांनी स्वीकारली. या ग्रंथ प्रमाण्याला कोणी आव्हान देऊ नये, म्हणून अपौरुषेय ठरविण्यात आले. हे ग्रंथ कोणत्याही पुरुषाने लिहीले नसून ते दैवी आहेत असा कांगावा करण्यात आला. या ग्रंथाना अपौरुषेय ठरविताना महिला वर्गाला महत्त्व देण्यात आले नव्हते म्हणजेच कोणालाही दैवीशक्ती असलेल्या महिलेने लिहिलेले नाही हे नमूद करून महिलांचा एकप्रकारे उपमर्द करण्यात आला होता. याचा अर्थ वर्चस्ववादाची सुरुवात पुरुष वर्चस्ववादपासूनच करण्यात आली.

सांस्कृतिक वर्चस्ववाद हा सगळ्यात महत्वाचा. अनादिकालापासून जगभर अनेक संस्कृत्या कार्यरत होत्या. या संस्कृत्या प्रमुख्याने विद्यापीठीय स्तरावरच्या होत्या. वैदिक संस्कृतीचे बीजारोपण गुरुकूल पध्दतीने केले आणि संवर्धनही केले. ही संस्कृती गुरु आणि गुरु दक्षिणा या आर्वतनातून बाहेर पडली नाही. गुरुकूल व्यवस्थेच्या शीर्षस्थानी असलेल्या ब्राम्हणांनाच शिक्षण दिले जायचे. इतरांना तेथे मज्जाव होता. गुरुकुलाचे अंगभूत व वर्चस्व जोपासने हेच असल्यामुळे एखाद्या एकलव्याने मनोमन द्रोणाचार्यांना गुरु समजून गुरुकूला बाहेर साधना केली तर गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापून द्यावा लागला. धनुर्विद्येत उजव्या हाताच्या अंगठयाला महत्त्व असते तोच जर नष्ट केला तर अर्जुन धनुर्विद्येत पारंगत असून त्याचे वर्चस्व मान्य केले जाईल असा विचार करुन आपला अंगठा कापून दिल्यावर धनुर्विद्येतील कनिष्ठता स्वीकारावी लागली. एकलव्याच्या अंगठयातून भळाभळा वाहणारे रक्त आजही या वर्चस्ववादा विरुध्द लढा पुकारत आहे. तथागत गौतम बुध्दाच्या तक्षशील आणि नालंदा विद्यापीठानी जी संस्कृती जोपासली ती जगत कल्याणकारी ठरली. तिने कोणत्याही प्रकारचा वर्चस्ववाद अंमलात आणली नाही आणि म्हणूनच व्यवस्थेने नाकारलेल्या महिला विदुषी ठरल्या. नालंदा आणि तक्षशिलेने जे साहित्य प्रसारित केले. त्यामुळे तथागत गौतम बुध्दाची समतावादी विचारसरणी जगभर स्विकारली गेली. ज्या ज्या देशांनी वर्चस्ववाद नाकारला त्या देशांनी प्रगती झालेली आहे. पूर्वेकडील जपान सारख्या अनेक देशांची उदाहरणे देता येतील. परंतु त्यांनी ही संस्कृती नाकारली ते देश आपली प्रगती करु शकले नाहीत याचे मासालेवाईक उदाहरण म्हणजे भारत.

सांस्कृतिक उत्थानाच्या कामी महत्वाची जबाबदारी असते ती लेखकांची, विचारवंताची, समाज वैज्ञानिकांची. आंबेडकरी चळवळीला सामर्थ्य दिले ते याच लोकांनी. बाबासाहेबांची वर्चस्ववादा विरोधाची चळवळ याच लोकांनी प्रस्फुरत केली. अभंग काव्य, शायरी, पोवाडे, जात्यावरची गाणी इत्यादी माध्यमे त्यांनी स्वीकारली होती. मूकनायक ते प्रबुध्द भारत या मुखपत्रांच्या प्रवासात हेच कार्यक्षम होते. त्यांच्यामुळेच आंबेडकरी चळवळीला झळाळी प्राप्त झाली होती. स्वाभिमान नीतिमत्ता यांना तिनेच मुखर केले होते. ज्या आंबेडकरी चळवळीचे पंख विहीनांना गरुडांबरोबर लढविले ते लेखक, कवी आज गायब झालेले दिसतात. खरेतर आंबेडकरी चळवळीची आज विपन्नावस्थेत आली असता त्यांच्याच लेखण्या तळपायला पाहिजे होत्या. पण का कोण जाणे त्या आज मोडीत निघाल्या आहेत. ब्रेन आणि पेन यांना महत्व देणाऱ्या बाबासाहेबांचे हे अनुयायी आपला ब्रेन व्यवस्थेकडे गहान ठेवत आले तर पेन लाचारी स्त्रवत आहे. याला काय म्हणावे? आज लोकशाही धोक्यात आहे, भारतीय संविधान मोडीत काढले जात आहे अशावेळी लेखकांच्या बंदुका ठरायला पाहिजे होत्या. परंतु स्वार्थ त्यांना नपुसंक करीत आहे. सरकारी कोटयातले घरे मिळावे, एखाद दुसऱ्या शासकीय कमेटीवर आपली वर्णी लागावी म्हणून हे लोक स्वाभिमान शुन्य झाले आहेत. लोकशाहीच्या संवर्धनासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी सारख्यांचेच नव्हे तर अबला समजलेल्या गौरी लंकेश सारख्यांचा राजरोसच बळी घेतले जात असताना आंबेडकरी चळवळीतील लेखकांनी गप्प बसणे क्लेशदायक आहे. खैरलांजी, खर्डा, जवरवेडा सारखी हत्याकांडे घडत असताना सरकारला पळता भुई कमी करण्याऐवजी त्या सरकारचेच पोवाडे गाणे म्हणजे आंबेडकरद्वेष जपणे. लेखकांना व विचारवंताना आलेला या गर्भगळीतेचे व निष्क्रियतेचे कारण म्हणजे त्यांनी स्वीकारलेली राजकीय नेत्यांची हुजरेगिरी. बाबासाहेबांनी राजकारणाला महत्त्व दिले होते, नव्हे तर समाज प्रगतीसाठी राजकारण ही मास्टर कि (master key) असल्याचे समजत असत. बाबासाहेबांनी १९३५ नंतर राजकारण केले. परंतु त्याचा उपयोग त्यांनी व्यवस्था बदलण्यासाठी केला. आपले स्वातंत्र्य गहान टाकुन सत्ता टिकविण्यासाठी नव्हे. त्यांना स्थित्यंतर पाहिजे होते आणि ते त्यांनी केले; प्रसंगी सत्तेवर लाथ मारुन उच्च पद ते सहज हाशिल करु शकले असते. परंतु, त्या पदांसाठी त्यांना गुलामी स्विकारायची नव्हती. बाबासाहेब गुलामांना बंध मुक्त करणारे होते, गुलामांची पैदासी करणारे नव्हते ते तसे नव्हते म्हणून तर अर्ध्या जगाचे आयकॉन ठरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक कणखर आणि दणकट आदर्श असताना लाचाराने स्वभिमान शून्यांना आपला आदर्श म्हणून का स्विकारावे? जे स्वतं:च स्वाभिमान शून्य आहेत, पोटार्थी आहेत अशाच लोकांना भाजप या राजकिय पक्षाला बळ दिले आहे. आपण आपल्या शत्रूला बलवान करीत आहोत आणि त्यामुळे आपणच आपला अध:पात करीत आहोत. याचे भान या लोकांना नाही. काल भाजपला सांप्रदायिक जातीयवादी ठरवून त्याला समर्थन देण्या ऐवजी काँग्रस- राष्ट्रवादी काँग्रेसला टेकू दिला होता. पण हा टेकू टिकू शकला नाही म्हणून वर्चस्ववादी असलेल्या राष्ट्रीय स्वयं सेवक संघाकडून भाजप साथ म्हणजे कपाळमोक्ष, याची जाणीव या लेखकांनी करून द्यायला पाहिजे तेच या नेतृत्वाच्या बंगल्यादारी श्वान ठरल्यावर दोष तरी कोणाला द्यायचा? आंबेडकरी जनता हा मोठा प्रसार करीतआहे. त्यांना आज ना उद्या उपरती झाल्याशिवाय रहाणार नाही. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेलेली असेल.स्वाभिमानाचे मातेरे झालेले असेल.

राजकारणातील लोक स्वाभिमान शून्य झाल्यामुळे आणखी एका क्षेत्रात वर्चस्ववाद बोकाळत आहे. तो शिक्षा क्षेत्रात. बाबासाहेबांनी शिका असा मंत्र आपल्या अनुयायांना नुसता दिलाच नाही तर त्यासाठी उच्च शिक्षित करावे या उद्देशाने शैक्षणिक संस्था काढून महाविद्यालये स्थापन केली. बाबासाहेबांच्या आदेशानुसार आंबेडकरी समाजात मोठया प्रमाणात पदवीधर निर्माण झाले. पदवीधरांचे वाढते प्रमाण म्हणजे वर्चस्ववाद जोपासनाऱ्या गुरूकूल व्यवस्थेला चपराक. इथे गुरु दक्षिणा देण्याचा प्रश्नच नव्हता आणि त्यामुळे बाबासाहेबांनी तरतूद केलेल्या राखीव जागांवर या उच्चशिक्षितांना नोकऱ्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गुरु दक्षिणा हा सुध्दा एक प्रकारचा भ्रष्टाचारच. देवाला नैवेद्य आणि गुरुला गुरुदक्षिणा यात फरक असा कोणताच नाही. गुरुकुलातून बाहेर पडणाऱ्या कोवळ्या तरुणांना भ्रष्टाचारी करण्याची शिकवणूकच बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे समाज व्यवस्थेत बदल झाला. अस्पृश्यांना नोकऱ्या मिळू लागल्यामुळे वित्तहीनाकडे वित्त येऊ लागले, प्रतिष्ठा मिळू लागली. मनुस्मृती पराभूत होवू लागली. मर्यादीत स्वरुपात का होईना सत्ताहिनांना सत्ता मिळाली, सत्तेमुळे संपत्ती मिळाली व संपत्तीमुळे प्रतिष्ठा मिळाली. प्रतिष्ठा वर्ण वर्चस्ववादयांना खुपू लागली आणि म्हणूनच आलिकडे मागासवर्गीय तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आरक्षणाला विरोध या मानसिकतेतून होऊ लागला. आरक्षणामुळे आंबेडकरी समाजात डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, सनदी अधिकारी यांच्यात अडथळे निर्माण केल्यामुळे मिळालेल्या प्रतिष्ठेला उतरती कळा लागली आहे. आंबेडकरी समाजातील कर्ते लोक शैक्षणिक संस्था काढण्याऐवजी त्यांना नगरसेववक, आमदार, खासदार वा एखादे मंत्रीपद घेण्यात भले मानीत आहेत. समाजाला सत्ताधारी करण्याच्या हव्यासापोटी उलटया गतीने प्रवास सुरू झाला आहे. हा प्रवास थांबला नाही तर पुन्हा एकदा पेशवाई अस्तिवात येईल; कारण सत्तेसाठी कोणाबरोबरही शय्यासोबत करावी लागते.  ही लागण समाजाला लागली आहे. शत्रुंना मित्र समजण्यात येऊ लागले आहे अशावेळी भरकटलेल्या नेतृत्वाला वठविण्यावर आणण्याचे काम साहित्यिकांनाच करावे लागेल. हे साहित्यिक विसरलेकी त्यांची हिसकावलेली लेखणी बाबासाहेबांनीच मिळवून दिली आहे. साहित्यिकांनी याचे भान राखून वर्चस्ववादी विरुध्द व या वर्चस्ववादाला बळी पडलेल्यांच्या विरुध्द शस्त्र उपसावे. बाबासाहेबांच्या विचारातून स्थापन केलेल्या पक्षाचा झेंडा एका हातात तर दुसऱ्या हातात सनातन्यांचा झेंडा हे कुठवर चालायच? आलिकडे तर वर्चस्ववादी भाजप हाच आमचा पक्ष आहे, म्हणण्या पर्यंत काहीची मजल गेली आहे. या वाढत्या प्रतिगामी प्रवृतीलावेळीच रोखणे महत्वाचे ठरते. तसे केले तरच आपला आंबेडकरवादी असल्याचा दावा करु शकतो. जी आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांनी अपार कष्टाने प्रज्वलित केली तिचे भवितव्य अंधारमय करायचे की उज्वल करायचे हे ठरविण्याची वेळ आलेली आहे.

(दलित साहित्यिक ज.वि.पवार- मो.नं. ९८३३९६१७६१)

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *