Breaking News

चंद्रकांत खैरेंचे पुर्नवसन करण्यावाचून भाजपाकडे पर्याय नाही पराभवाला शिवसेनेसह भाजपही जबाबदार

औरंगाबादः जगदीश कस्तुरे
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत शिवसेनेचे भाजपशी संबंध बिघडले आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पण भाजपासुध्दा देशभरात एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर राज्यसभेवर चंद्रकांत खैरेंना सहज पाठवून उध्दव ठाकरेंची नाराजी ते काही बोलायच्या आत दूर करतील.
१९८८ सालापासून नगरसेवक ते खासदार असा प्रवास केलेले चंद्रकांत खैरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिवसैनिक मानले जातात. त्यांच्या या विश्वासू पणाची पुरेपुर फळे आजपर्यंत चंद्रकांत खैरेंनी चाखली आहेत. त्यामुळे बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेमधे खैरेंच्या शब्दांना महत्व प्राप्त झाले होते. गेली दोन दशके खासदार राहूनही शहरातील पाणी, रस्ते, कचरा प्रश्नाकडे फारसे गांभिर्याने शिवसेनेने पाहिले नाही. याचा औरंगाबादेतील शिवसेना कार्यकर्त्यांना जाब विचारण्याऐवजी खैरेंनी जबाबदारी झटकली. त्यामुळे औरंगाबादेतील शिवसैनिक बिथरले त्यांचे चंद्रकांत खैरेंशी वामरंवार खटके उडू लागले. पण खैरेंना प्रत्यक्ष बोलण्याची हिम्मत दाखवणारे शिवसैनिक नसल्यामुळे त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडे खैरेंच्या बेजबाबदार पणाचे पाढे वाचण्यास सुरुवात केली होती. तर काही आ. जलील यांच्याकडेही लक्ष घालण्यासंदर्भात सूचना करत होते. त्याचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला. तसेच नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांची राजकिय समज चंद्रकांत खैरेंपेक्षा केव्हाही चांगली असल्याचे मान्यच करावे लागेल. इम्तियाज जलील खासदार झाल्यामुळे दलित आणि मुस्लीम समाजाचा लोकशाहीवरील विश्वास वाढल्याचे दिसत आहे. खा. जलील हे कष्टाळू आहेतच त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे त्यांना योग्य भान असल्याचे लक्षात येते.जातीयवाद किंवा हमरीतुमरीवर येवून वावरणारे जलील नाहीत अशी त्यांची शहराला जुनी ओळख आहे.
गेल्या ४० वर्षांपूर्वी डॉ. रफीक झकेरिया यांचीही प्रतिमा अशीच होती. आपल्याला शहरासाठी काही करायचे आहे याचे त्यांना नेहमीच भान होते. त्यांनी प्रत्यक्षात कृतीही केली. फार पूर्वीपासून औरंगाबादेत जातीवर आधारीत निवडणूका होत आहेत. गेले २० वर्ष चंद्रकांत खैरे खासदार झाले. मुस्लीम मतांच विभाजन होत होत. म्हणून त्यांची निवड होत होती. आता अपक्ष आ. हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना मिळणारी मते फोडली. त्यामुळे जलील निवडून आले. २०१४ सालीही विधानसभा निवडणूकीच्या वेळी किशू तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल यांच्या भांडणामुळेच जलील आमदार झाले होते.
आता निवडून आल्यावर इम्तीयाज यांना शहरवासियांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही याची पूर्ण जाणीव खा.जलील यांना झाली आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *