Breaking News

पार्थसाठी कि अंतर्गत राजकारणामुळे पवारांची निवडणूकीतून माघार ? मावळमधून मात्र पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित

पुणे-सोलापूरः प्रतिनिधी
राज्यातील आणि देशपातळीवरील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आतापर्यंत घेतलेला निर्णय कधी मागे फिरविल्याचे ऐकिवात नाही. परंतु यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी शरद पवार यांनी मागे घेतल्याने केवळ पार्थच्या नावाखाली की सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणाचा फटका बसण्याच्या भीतीने पवारांनी मागे घेतली यावरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सोलापूरातील माढा लोकसभा मतदारसंघातून २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत शरद पवार हे विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा ते याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत देण्यात आले होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या आणि मोदी लाटेमुळे पवार यांनी २०१४ च्या निवडणूकीत माघार घेत निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले.
त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते विजयसिंह मोहीते-पाटील यांना तिकिट देत त्यांची पक्षातंर्गत असलेली नाराजगी दूर करण्यात आली. त्या निवडणूकीत मोहीते-पाटील यांनी विजय मिळविला.
सोलापूरातील जवळपास ८ ते १० तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु अकलूजच्या मोहीते-पाटील घराण्याने प्रत्येक तालुक्यात आपल्या गटाचा एक समर्थक निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला आव्हान निर्माण करून दिले. त्यामुळे मोहीते-पाटील गटाच्या विरोधात पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माढाचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, बार्शीचे दिलीप सोपल यांच्यासह अनेकजण विरोधात आहेत.
परंतु तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोहीते-पाटील यांची ढवळाढवळ नको म्हणून गतवेळी सर्वांनी विजयसिंह मोहीते-पाटील यांना लोकसभेवर पाठविले. मात्र यंदा लोकसभा निवडणूकीच्या पाठोपाठ लगेच विधानसभा निवडणूका येत असल्याने आणि पूर्वी सारखी मोदी लाट नसल्याने पुन्हा मोहिते-पाटील यांचे डोक्यावर ओझे नको अशी भावना जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आहे.
त्यामुळेच शरद पवार यांना पुन्हा एकदा यंदाच्या निवडणूकीत माढा मतदारसंघातून उभे करण्याचा प्रयत्न आमदार बबनराव शिंदे आणि अन्य मंडळीकडून होत होता. त्यानुसार पवारांनी सुरुवातीला होकारही दिला. मात्र यंदा माढा मतदारसंघात येणाऱ्या आणि मोहिते-पाटील यांचा गड मानल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यातून पवारांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु असल्याची माहिती बाहेर येण्यास सुरुवात झाली. यामुळे पवारांनी माढ्यातून काढता पाय घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
मात्र शरद पवार यांनी सुरुवातीला अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा उमेदवारीला विरोध दर्शविला. परंतु आता त्यांनी पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित करत स्वतः मात्र निवडणूकीत माघार घेत असल्याचे जाहीर संकेत दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *