Breaking News

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

मुंबई : प्रतिनिधी

औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना तर मागवाच  तसेच जागतिक स्तरावरील  सल्लागार देखील नियुक्त करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले.

वर्षा येथील समिती सभागृहात यासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde, उर्जा मंत्री नितीन राऊत (Dr.Nitin Raut), पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) आदींची यावेळी उपस्थिती होती.

पैठणला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. औरंगाबाद परिसरात आलेले पर्यटक आवर्जून पैठण येथे भेट देतात. याठिकाणी जायकवाडीसारखे देशातले मोठे धरण आहे. त्यामुळे या संत ज्ञानेश्वर उद्यानाची दूरवस्था दूर करून जागतिक दर्जाचे उद्यान याठिकाणी बनले पाहिजे. यासाठी लोकांमधून चांगल्या नाविन्यपूर्ण कल्पना मागवा तसेच जागतिक स्तरावरील सल्लागार नेमण्याची प्रक्रिया लगेच सुरु करा असे त्यांनी जलसंपदा विभागाला सांगितले.

यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील जायकवाडीप्रमाणे इतरही धरणांच्या परिसरात पर्यटनाच्या संधी असून या सगळ्यांचा सुद्धा विकास केला गेला तर पर्यटन व इतर उद्योग वाढतील.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमटीडीसीच्या(MTDC) सात जागा विकसित करणे सुरु असून संत ज्ञानेश्वर उद्यानासारखी मोठी जागा विकसित करताना उत्कृष्ट नियोजन करावे व त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार असावा अशी सूचना केली. मंत्री संदीपान भुमरे यांनी देखील या भागात मुबलक पाणी असून इथे परिसर विकास झाल्यास छोटे मोठे उद्योग, परंपरागत व्यवसायांना बळकटी येईल अशी आशा व्यक्त केली.

प्रारंभी जलसंपदा प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले की,  हे उद्यान २००२ साली प्रायोगिक तत्वावर देखभालीसाठी एका खासगी संस्थेला दिले होते. मात्र त्याची व्यवस्थित देखभाल होऊ शकली नव्हती म्हणून २०११ मध्ये परत जलसंपदा  विभागाने त्याची जबाबदारी घेतली होती. या उद्यानाची जागा ३१० एकर असून मधल्या काळात त्यातील काही भाग कृषी, वन तसेच पर्यटन विभागाला देण्यात आला होता. आता सुमारे २०० एकर जागेवर उद्यान आहे. जागतिक बँकेकडेही एक प्रस्ताव पाठविण्यास मान्यता मिळायची आहे असे सांगून लोकेश चंद्र म्हणाले की विभागाने सौंदर्यीकरणासाठी ४० कोटींचा प्रस्ताव केला आहे. याठिकाणी वॉटर पार्क, खेळणी व प्राणीसंग्रहालय, थीम पार्क उभारण्याचे नियोजन आहे.

यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी देखील सूचना केल्या.

Check Also

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *