पुण्यातील मुंढवा परिसरातील ४३ एकर महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे केवळ ३०० कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. तसेच याप्रकरणी अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राज्याच्या राजकिय वर्तुळात केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर महार वतन जमीन पीडित दलित शेतकऱ्यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट घेऊन व्यथा मांडली. या प्रकरणी पीडित दलित शेतकऱ्यांनी आमची फसवणूक करण्यात आल्याचे सांगितले.
ही जमीन पूर्वी सरकारने भाडेपट्ट्यावर दिली होती. तथापि, योग्य सरकारी मान्यता न घेता आणि सरकारी संगनमताने, हा करार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ९९% हिस्सा असलेल्या कंपनीला करण्यात आला. शिवाय, या करारावर २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले.
अॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे भ्रष्टाचार आणि अन्यायाचे उदाहरण आहे. ‘मी खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही’ असे म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करावे – हे तुमचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे का? ‘सबका साथ, सबका विकास’चे हे वास्तव आहे का? असा सवालही यावेळी केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले की, पीडित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात निदर्शने केली. पीडित शेतकऱ्यांना घेऊन पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
Marathi e-Batmya