Breaking News

उदय सामंत यांचा पलटवार, एअरबस प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार

एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला राज्याचे शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार करत हा प्रकल्प जाण्यास महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरले असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नव्हता असा गौप्यस्फोट केला.

विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी उदय सामंत यांनी आज त्यांच्या मुक्तगिरी या शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

वेदांता-फॉक्सकॉननंतर आता टाटा एअर बसचा प्रकल्पही गुजरातल्या गेल्याने राज्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. हे सांगतानाच येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात वेदांतपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात नक्की येईल. तो कधी येईल? त्याच नाव काय हे आत्ताच सांगणं योग्य नाही. मात्र आमच्यावर टीका करणाऱ्यांनी शाल आणि श्रीफळ घेऊन आमच्या स्वागतासाठी तयार राहा, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकरमधी मंत्र्यांना टोला लगावला.

स्वतः सरकारमध्ये असताना काहीही करायचं नाही आणि आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडायचं असा प्रकार आत्ताचे विरोधक करत आहेत. काहीही न करण्यापेक्षा त्यांचा सुरू असलेला विरोध हा चांगलाच आहे. पुढील २५ वर्षे हा विरोध कायम रहावा, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो, असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राज्यात सहा लाख कोटींची गुंतवणूक जे महाविकास आघाडी सरकारने आणली होती, तर राज्यातील निम्यापेक्षा जास्त बेरोजगारी दूर व्हायला हवी होती. आंध्रप्रदेशातील एक व्यक्ती एअरबसच्या एका अग्रवाल नावाच्या व्यक्तीला भेटले. त्यांनी सल्ला दिला होता कि यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. हे अधिकारी सांगतात, अशी माहिती सामंत यांनी दिली.

बीडीपीच्या प्रकल्पाचा अर्ज ऑक्टोबर २०२० ला झाला, सप्टेंबर २०२१ला या प्रकल्पाचा एमओयू झाला, वेदांताचा अर्ज आमच्याकडे जानेवारी २०२२ ला आलं होतं तेव्हा गुजरातची निवडणूक नव्हती. मी आजही ठामपणे सांगतो आहे की, अजून वर्षभरांनंतर आम्ही सगळ्यांना बोलवून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही यादी ठेवणार आहोत. की शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर किती रोजगार निर्माण केले. किती लोकांना आम्ही त्यांच्या पायावर उभं केलं, याचा लेखाजोखा आम्ही ठेवणार आहोत असेही ते म्हणाले.

इंडियन पल्प पेपर प्रायव्हेट लिमिटेड हा रायगडमध्ये २० हजार कोटींचा प्रकल्प येऊ घातला असून त्याचा एमओयू आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, त्यानंतर कॅबिनेट सब कमिटीची बैठक जी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात होणे अपेक्षित होते. मात्र, ती होऊ शकली नाही. यावरुन त्यांची महाराष्ट्रात उद्योग आणण्याची मानसिकता किती होती ही गोष्ट लक्षात येईल. उद्योजक महाराष्ट्रात येण्यासाठी लागणाऱ्या बैठका आणि परवानग्याच तेव्हा दिलेल्या नव्हत्या आणि आत्ता त्यांच्याच काळात गेलेल्या प्रकल्पावरुन कसा आकांडतांडव सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

काही लोकांच्या ट्विट्सवरुन जर शहानिशा न करता टीका केली जात आहे हे चिंताजनक आहे. जी माहिती कुठेही उपलब्ध नाही अशी माहिती सोशल मिडीयावरून फिरवायची. युवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही हातात राहिले नसल्याने फडणवीस-शिंदेंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा उद्योग सुरु आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंवर पलटवार केला.

राजकीय फायद्यासाठी विरोधकांकडून युवकांची दिशाभूल सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता जर का मीडिया आणि नेतेमंडळी विश्वास ठेवणार असतील तर हे चिंताजनकच आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रीया देत असताना सांगितलं की जर कुठला प्रकल्प अशा पद्धतीने जात असेल तर तो का गेला याचा विचार व्हायला हवा, मला वाटतं ही भूमिका परिपक्व राजकारण्याची आहे. युवकांची दिशाभूल करुन राजकीय फायदा उचलण्यापेक्षा एकत्र येऊन कुठले प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतात याचा विचार करायला हवा, असे म्हणत जयंत पाटील यांचे कौतुक केले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *