Breaking News

उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, शिवसेनेशी गद्दारी केलात शेतकऱ्यांशी नको औरंगाबादेतील दौऱ्यात उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला हातचा घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज रविवारी औरंगाबादेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवित इशाराही दिला.

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी केलात त्यावर मी काही आता बोलणार नाही. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका असा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

पावसाची सुरुवात ही चक्रीवादाळाने होते. त्यानंतर मग संततधार, अतिवृष्टी ढगफुटी होते. मागील आठ-दहा दिवसांपूर्वी पुण्यातही अतोनात पाऊस पडला. रस्ते तुंबले घरात पाणी गेलं. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं नाही असा भाग नाही. कारण, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे, तर त्यांनी उत्तर दिलं की पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावत ते पुढे म्हणाले त्याचप्रमाणे ते इथल्याबाबतीतही म्हणतील की शेतात आणि ग्रामीण भागात पाऊस किती पडावा हे सरकारच्या हातात नसतं अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकरी जगला तर आपण सर्व जगू. शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. हे आपल्या हातात नसतं, परंतु ही अस्मानी संकटं आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावर पडता कामा नये. परंतु आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेण या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे. दिवाळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचं? हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. मी का मुद्दाम आलो. केवळ आज विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही. तर या शेतकऱ्यांचं ऋण आपल्यावर आहे, नेहमीच असतं असेही ते म्हणाले.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, त्यांचा दौरा हा २४ मिनिटांचा होता या अब्दुल सत्तारांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं. सत्तारांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते सत्तेसाठी किती आंधळेपणाने वागत आहेत, हे पाहून मला कीव येते. स्वत:ची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याच्या एका कारणासाठी त्यांनी सत्तांतर घडवलं. आमच्याशी गद्दारी केली आहे, पण निदान आमच्या अन्नदात्याशी गद्दारी करू नका. नेमका आणखी किती पाऊस पडल्यानंतर तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणणार आहात? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही. ओल्या दुष्काळाचं नेमकं सत्य काय आहे? हे पाहण्यासाठी मी ऐन दिवाळीत येथे आलो आहे. माझ्यामुळे हे सत्य जगासमोर येईल. हा माझा प्रतिकात्मक दौरा आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पीक नासून गेलं आहे. त्यांचं सोनं डोळ्यादेखत मातीमोल झालं आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

आयुष्यात अनेक संकटं येत असतात. पण शेतकऱ्यांनो आत्महत्येचा विचार मनात आणू नका. ऐनवेळी राज्यात सरकार बदललं असलं तरी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. सरकारला पाझर फुटत नसेल तर त्यांना घाम फोडा, असं आवाहनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *