Breaking News

शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई जिंकली: नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली

शिवसेनेत बंडखोरी करून नवे सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज संसदीय लढ्यातील पहिली लढाई जिंकली. नव्या राज्य सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशान्वये विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. या अधिवेशनात विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदासाठी आज निवडणूक शिरगणतीनुसार घेण्यात आली. या निवडणूकीत शिंदे-फडणवीस सरकारच्यावतीने राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी हे उमेदवार होते. यात झालेल्या मतदानानुसार राहुल नार्वेकर यांना १६४ मते तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. सर्वाधिक मते राहुल नार्वेकर यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या निमित्ताने देशातील सर्वाधिक तरूण विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर यांची नोंद झाली.

या निवडणूकीला भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे गैरहजर राहिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ ते ७ विधानसभा सदस्य गैरहजर राहिले. याशिवाय काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या ही गैरहजर राहिल्या. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल हे गैरहजर राहिले. त्याचबरोबर समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे आणखी एक आमदार तटस्थ राहिले.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये चांगलीच घट झाली. तर भाजपाकडील १०६ अपक्ष मिळून ११३ इतके आमदार आहेत. त्यात बंडखोर शिंदे गटाचे जवळपास ३९ आमदार आणि अपक्ष आणि छोटे पक्ष धरून ५० संख्या होते. यासर्वांची मिळून १६३ इतके मतदान राहुल नार्वेकर यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. यावरून महाविकास आघाडीकडील एक मत फुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ५२, काँग्रेसची ४४ आणि शिवसेनेची राहिलेली १६ मते अशी मिळून ११२ मते होतात. यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात असल्याने त्यांना मतदानाला हजर राहता आले नाही. मात्र इतर काही सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे ११२ मतांऐवजी राजन साळवी यांना १०७ मते मिळाली.

यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि भाजपाने पहिली लढाई जिंकली आहे. आता उद्या म्हणजेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक आणला जाणार आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *