Breaking News

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर

अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भातील माहिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अल्पमतात आलेल्या सरकारने नामांतराचा निर्णय घेतला होता. परंतु तो अल्पमतातील सरकारचा निर्णय असल्याने त्याच्या कायदेशीर वैधतेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे ते सर्व निर्णय फेर विचारार्थ सादर करण्याचे निर्देश मागील बैठकीत देण्यात आले. त्यानुसार हे सर्व निर्णय आज फेरविचारार्थ सादर केले. त्यास आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचे सांगत बहुमताच्या सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता या निर्णयाचे प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यात येवून त्यास ठरावाच्या माध्यमातून मंजूरी घेवून त्यास कायद्यात रूपांतरीत करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल असेही स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजूरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
—–०—–
नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार १२.५६ योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले २२.५% योजनेचे धोरण सुद्धा १२.५% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून ११६० हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण ११६० हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.
नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *