Breaking News

नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी माईक खेचून घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर पत्रकार परिषदेतच चिठ्ठी देताना आढळून आले. आता तर भर पत्रकार परिषदेत कानात बोलत एमएमआरडीएचा विषय राहिला असल्याची आठवण करून दिल्याने आता राजकिय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

हिंदूत्व आणि  निधी मिळत नसल्याची तक्रार करत शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर शिंदे गटाने भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीही बसविण्यात आले. मात्र जरी राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली असली तरी सारे निर्णय हे देवेंद्र फडणवीस हे जसे सांगतील तसेच होत असल्याचे चित्र राज्यात निर्माण होत आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्यात आले. त्या अधिवेशनात बहुमत चाचणी आणि नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते. मात्र मध्येच एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढून घेतला.

त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री हे दोघेही पत्रकार परिषदेला सामोरे गेले. मात्र पत्रकार परिषद सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा निर्णय जाहिर करणार तोच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांकडे सरकावली. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी फडणवीसांवर चांगलीच टीकेची झोड उठविली.

त्यानंतर आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित पत्रकार परिषदेला आले. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच फडणवीस यांनी आज काही माईक काढून घेण्याचा प्रकार नाही कारण दोन माईक लावण्यात आले आहेत असे सांगात ना चिठ्ठी देण्याचा प्रकार असे काहीच होणार नाही असे सांगत पत्रकार परिषदेला सामोरे गेले. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराच्या निर्णयाची माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानाला लागत कुसफुस करण्यास सुरुवात केली. मात्र तेथे असलेल्या माईकमुळे फडणवीस यांनी शिंदे यांना एमएमआरडीचा विषय राहिल्याची आठवण करून दिली. त्यानंतर शिंदे यांनीही एमएमआरडीएबाबत झालेल्या निर्णयाची माहिती दिली.

त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे जरी असले तरी त्यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस काही केल्या पूर्ण होत नाहीत अशी खसखस पसरली आहे.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *