Breaking News

संजय राऊत म्हणतात PM ची डिग्री दाखवा; तर शरद पवार म्हणाले, हे जास्त महत्वाचं आहे का ? बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न महत्वाचे

मागील काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री दाखविण्याच्या केलेल्या मागणीवरून गुजरात उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. त्यावरून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत आला असताना राज्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ती डिग्री बोगस असल्याचा आरोप करत मोदी यांनी डिग्री दाखवावी अशी आग्रही मागणी केली. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेत, देशात बेरोजगारीचा प्रश्न असताना डिग्रीचं कसलं घेऊन बसलात ? असा प्रतिप्रश्न करत ठाकरे गटाच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आपल्या देशातल्या लोकांसमोर डिग्रीचा प्रश्न आहे का? तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? त्यांची डिग्री काय? हे जास्त महत्त्वाचं आहे का? बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं मत व्यक्त केले. लाखो, कोट्यवधी डिग्रीधारक बेरोजगार आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री विचारली जाते आहे. ती त्यांनी दाखवली पाहिजे. त्यात काही चुकीचं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी-अदानी संबधावरून आणि अदानी कंपनीतील २० हजार कोटी रूपयांच्या गुंतवणूकीवरून चीनी नागरिकांच्या भागिदारीवरून प्रश्न उपस्थिते केले. तसेच त्यासाठी संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी करत अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज होऊ दिले नाही. या सगळ्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी यांच्या मालकीच्या एनटीव्ही इंडिया या वृत्त वाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदिय समितीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली समिती योग्य असल्याचे वक्तव्य करत काँग्रेसच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर शिवसेनेसह इतर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा शरद पवार यांनी डिग्रीचा मुद्दा महत्वाचे नसल्याचे सांगत इतर प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगत वेगळी भूमिका मांडली. या सगळ्या भूमिकांवरून आगामी निवडणूकांच्या दृष्टीने शरद पवार हे काँग्रेससह इतर विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरक ठरतील अशी भूमिका जाणीवपूर्वक तर मांडत नाही ना अशी चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु झालेली आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *