Breaking News

शिंदेंच्या त्या टीकेवर सुषमा अंधारे म्हणाल्या,…तर एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण भाजपाकडे गहाण उध्दव ठाकरेंवर केलेल्या आत्मपरिक्षणाच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात लोकशाही नसल्याचे दिसून येत असल्याचे कारण पुढे करत आणि शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना आत्मपरिक्षण करण्याचा खोचक सल्ला देत काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवून आणल्याचा टोला लगावला. एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या नेते सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या, शिवसेनेचे मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदेंना अधिकार होते. आता मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीसांच्या परवानगीशिवाय एकही निर्णय घेता येत नसल्याचा अशी टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर आज पुण्यात सुषमा अंधारे यांना विचारले असता त्यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे कधी कधी आरशासमोर उभं राहून बोलतात, असं वाटतं. कारण ज्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे मंत्री असताना अधिकार होते, त्या एकनाथ शिंदेंना आता मुख्यमंत्री असूनही फडणवीसांच्या परवानगीशिवाय एकही निर्णय घेता येत नाही. अजून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही, अशी खोचक टीकाही केली.

सुषमा अंधारे या पुढे बोलताना म्हणाल्या, एकनाथ शिंदे जर खरंच महाराष्ट्र, शिवसेना आणि धनुष्यबाण यांची गौरव, गरिमा आणि अस्मिता शाबूत ठेवण्यासाठी काम करत असतील, तर कोश्यारींच्या राजीनाम्यापूर्वी त्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केली असती. पण ते त्यावर चकार शब्द बोलले नाहीत. बेळगाव प्रश्नावरही ते जोपर्यंत केंद्र सरकार इशारा करत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे चकार शब्द बोलले नाही. बोम्मईच्या आक्रमकपणाला विरोध करण्याची हिंमत एकनाथ शिंदे यांनी दाखवली नाही. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण भाजपाकडे गहाण ठेवल्याचा पलटवार केला.

कालचं शिंदे गटाचा जल्लोष म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटणारी माणसं असतात, त्याप्रकारचं तो जल्लोष होता. कारण भक्तगणांना हे कळत नाही की भाजपाने शिवसेनेचं किती नुकसान केलं आहे. त्यापेक्षाही एकनाथ शिंदेंची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काल शेवटचा घाव घातला आहे. याचं उत्तर जनता मतपत्रिकेतून देईल आणि भाजपासह शिंदे गटाच्या ४० आमदारांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, अशा सूचक शब्दात इशारा देत टीका केली.

यावेळी पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, प्रतिकांचं राजकारण महत्त्वाचं असलं, तरी प्रतिकांच्या राजकारणावर मुल्याधिष्ठीत राजकारण असतं, जे प्रत्येक शिवसैनिकांच्या ठायी आहे. या शिवसैनिकांची भावनिक नाळ ही मातोश्री, सेनाभवन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावांशी जोडली गेली आहे. जर एकनाथ शिंदे म्हणत असतील, की ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत, तर बाळासाहेबांचा शेवटचा शब्द होता, की माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा, याचाच अर्थ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नेतृत्व म्हणून स्वत: बाळासाहेबांनी निवड केली होती. बाळासाहेबांचा हाच शब्द जर हे लोक पाळू शकत नसतील, तर हे लोक किती सत्तातूर, फितूर आणि बदमाश असतील, हे कळतं, असा खोचक टोलाही लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *