Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवरून अजित पवारांची टीका, पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणूकीत फिराव लागतंय.. कसबा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा रोड शो

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा- शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात यापूर्वी अनेक पोटनिवडणुका पार पडल्या. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीत ‘रोड शो’च्या निमित्ताने फिरावं लागलं, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सतत सुनावणी होत असून नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. असं असताना निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाचा निर्णय आताच तडकाफडकी का दिला? याचादेखील विचार करण्याची गरज आहे. ही लढाई केवळ शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांची नाही. ही लढाई संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि लोकशाहीच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे.

न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणारच आहे. पण खरी दोन न्यायालये असतात. एक न्यायव्यवस्थेचं न्यायालय आणि दुसरं जनतेचं न्यायालय… जनता जनार्दन आता याबद्दलचा निर्णय घेईल. या प्रकरणात जी मुस्कटदाबी झाली आहे. त्या मुस्कटदाबीला राज्यातील जनता चोख उत्तर देईल, असा मला विश्वास आहे. अलीकडेच पाच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये जवळपास चार जागा महाविकास आघाडीच्या विचारांच्या उमेदवारांनी जिंकल्या. शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी आम्हाला निवडून दिलं, हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. त्यामुळे याही निवडणुकीकडे सर्वाचं बारकाईने लक्ष आहे, असंही अजित पवार पुढे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या ‘रोड शो’वरून टोला लगावताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका झाल्या. पण राज्याचे मुख्यमंत्री ‘रोड शो’च्या निमित्ताने फिरलेलं महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलं. आजही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यात ठाण मांडून आहेत. निवडणुकीकडे लक्ष देऊन आहेत.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *