Breaking News

मुंबईकरांचे आरोग्य धोक्यातः बीएमसीच्या सर्व्हेक्षणात आढळून आली ही माहिती WHO STEPS सर्वेक्षण संपन्न व निष्कर्ष

असंसर्गजन्य रोग आजारात अंतर्भूत हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने मृत्यूचे कारण आहे. असंसर्गजन्य रोगामुळे २०१६ मध्ये जागतिक स्तरावर ४० दक्षलक्ष नोंदणीकृत मृत्यू आहे, हे प्रमाण जागतिक मृत्यूच्या एकूण ७१% असून भारतामध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ६१% इतके आहे. यासाठी महत्वाचे कारणीभूत घटक म्हणजे तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळ आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे.

या सर्व जोखमीच्या घटकांची माहिती मुंबईसारख्या शहरासाठी उपलब्ध नाही. या जोखमीच्या घटकांचा अभ्यास केल्यास त्याबद्दल करावयाच्या उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने भागीदारी करून WHO STEPS SURVEY हे सर्वेक्षण राबविले. या अंतर्गत असंसर्गजन्य रोग विभागाचे बृहन्मुंबई महानगरपालिका पथक आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली, निलसन आईक्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्वतंत्र संशोधन संस्थेद्वारे आरोग्य संबंधित डेटा संकलन करण्यात आला. तसेच मुंबई WHO- STEPS सर्वेक्षणामधून प्राप्त निष्कर्षांना अंतिम रूप देण्यासाठी केईएम, नायर, सायन आणि कूपर यासारख्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचा सहभाग मिळाला व दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व्यक्तिंच्या असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात आले. STEPS सर्वेक्षण मुंबई उपनगरासह मुंबई शहरात ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यात आले. यात प्रथम टप्प्यात सामाजिक-जनसांख्यिकीय आणि वर्तणूक संबंधित माहितीसाठी डेटा संकलन करण्यात आला. दुसऱया टप्प्यात उंची, वजन आणि रक्तदाब यांचा डेटा संकलन करण्यात आला. तसेच तिसऱया टप्प्यात रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी बायोकेमिकल मोजमाप करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी एकूण ५ हजार ९५० प्रौढांशी संपर्क साधण्यात आला, यापैकी ५ हजार १९९ प्रौढांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात २ हजार ६०१ पुरुष आणि २ हजार ५९८ महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.

मुंबई STEPS सर्वेक्षणाचे प्रमुख निष्कर्ष

आहाराच्या सवयी:
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसनुसार, दररोज किमान ४०० ग्रॅम, फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने असंसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो. मुंबईतसुमारे ९४% नागरिक दररोज अपुरी फळे-भाज्या खात असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे, जे शिफरस केलेल्या प्रमाणापेक्षा ५० टक्क्यांनी कमी आहे.

मिठाचा वापर:
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार दैनंदिन जीवनात मीठ सेवन करण्याचे प्रमाण ५ ग्रॅम असावे असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, सर्वेक्षणात सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले आहे. जे खूप जास्त आहे.

शारीरिक व्यायाम:
जागतिक आरोग्य संघटना यांनी शिफारस केल्याप्रमाणे दर आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणात जवळजवळ तीन-चतुर्थांश (७४.३%) म्हणजेच (७/१० मुंबईकर) हे त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये (योग, सायकलिंग, धावणे, चालणे, पोहणे, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे फिटनेस/क्रीडा-संबंधित शारीरिक हालचाली करत नाहीत असे आढळले आहे.

बॉडी मास इंडेक्स (BMI= weight in kg/ height in m2):
मुंबई जागतिक आरोग्य संघटना स्टेप्स सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुमारे ४६% नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे (WHO वर्गीकरणानुसार BMI 25 kg/M2 किंवा त्यापेक्षा जास्त). १२% मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले व लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला. (WHO वर्गीकरणानुसार BMI 30 kg/M2 किंवा त्या पेक्षा जास्त)

तंबाखूचा वापर:
जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखूमुळे दरवर्षी ८ दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७ दशलक्षाहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या सेवनामुळे होतात. सर्वेक्षणानुसार एकूण तंबाखूच्या वापराचे प्रमाण १५% आहे. त्यापेकी १२% नागरिक दररोज तंबाखूचे सेवन करतात. हे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. मौखिक तंबाखूच्या (मशेरी, गुटखा, पान मसाला, खैनी) वापराचे प्रमाण सुमारे ११% इतके आहे, जे खूप जास्त आहे.

वाढलेला रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब: (≥१४०/९०)
मुंबईत, ३४% नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले आहे, त्यापैकी ७२% नागरिक हे सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळले आहे. जे उपचार घेत होते, त्यापैकी फक्त ४०% नागरिकांचा रक्तदाब नियंत्रणात असल्याचा आढळून आला.

वाढलेली रक्तातील साखर किंवा मधुमेह:
मधुमेहाच्या रूग्णांमध्ये, टाइप २ हा जास्त प्रमाणात असून भारतातील वृद्ध लोकांना (सामान्यतः ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या) प्रभावित करतो. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱया व्यक्तिंमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो.
• मुंबई शहरात साधारणतः १८% मुंबईकरांचे उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाण पेक्षा अधिक आहे. (रक्तातील वाढलेल्या साखरेच प्रमाण म्हणजे उपाशीपोटी साखरेचे प्रमाण ≥ १२६ mg/dl)
• प्री-डायबेटिस- (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी १५.६% आहे. (रक्तातील साखरेचे प्रमाण ≥ ११० mg/dl आणि < १२६ mg/dl) आणि जर अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर अशा व्यक्तिंना पुढे जाऊन मधुमेह होऊ शकतो.

• ८२% व्यक्ती हे सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांमध्ये रक्तातील वाढलेल्या साखरेसाठी उपचार घेत होते (ज्यांना पूर्वी रक्तातील साखर वाढल्याचे निदान झाले होते)
• जे उपचार घेत होते त्यापैकी फक्त ४२% व्यक्तिंना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात असल्याचे आढळून आले.
• ८.३% व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजार आढळले.

वाढलेला कोलेस्टेरॉल :
कोलेस्टेरॉल हे HDL (चांगले) आणि Non-HDL (हानिकारक) कोलेस्टेरॉल या दोन्हींचे मिश्रण आहे. व्यक्तिच्या एकूण कोलेस्टेरॉल पातळीचे प्रमाण ≥ १९० mg/dl असल्यास, त्या व्यक्तीची कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असे मानले जाते.
• या सर्वेक्षणात, सुमारे २१% व्यक्तिंना (५ पैकी १) एकूण कोलेस्ट्रॉल ≥ १९० mg/dl वाढलेले आढळले किंवा सध्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलसाठी औषधोपचार घेत आहेत.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे(CVD) जोखीम घटक:
CVD जोखीम घटकांचे मूल्यांकन उच्च जोखीम असलेल्या व्यक्तिंना ओळखण्यास मदत करते.

• १८-६९ वर्षे वयोगटातील सुमारे ३७% सर्वेक्षण व्यक्तींमध्ये मध्ये (जवळपास १० पैकी ४ मुंबईकर) खालील ६ जोखीम घटकांपैकी ३ किंवा अधिक जोखीम घटक असल्याचे नोंदवले गेले.

१. सध्याचे दैनिक धुम्रपान करणारे

२. दररोज शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा कमी फळे आणि भाज्या खाणे

३. अपुरा शारीरिक व्यायाम

४. लठ्ठपणा

५. वाढलेला रक्तदाब किंवा सध्या वाढलेल्या रक्तदाब साठी औषधोपचार करत आहे

६. वाढलेली रक्तातील साखर किंवा सध्या वाढलेल्या रक्तातील साखरेसाठी औषधोपचार सुरू असलेल्या व्यक्ती.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहिर

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून राज्यातील सत्तास्थानी असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती जागा, अजित पवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *