Breaking News

नाना पटोले यांचा सवाल, कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ ? आरेमध्ये कारशेड करण्याचा भाजपप्रणित सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल असे जाहीर करून भाजपप्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पर्यावरणाचा विचार करून आरे मधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत कोणाचे हितसंबध जोपासण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरु केल्याचा सवालही त्यांनी केला.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आरे मेट्रो कारशेड करण्यास पर्यावरणप्रेमी व मुंबईकर यांचा तीव्र विरोध आहे. कारशेड आरेमध्ये होऊ नये यासाठी मुंबईकर व हजारो पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. पण पोलिसी बळाचा वापर करून फडणवीस सरकारने आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली आणि रात्रीत हजारो झाडांच्या कत्तली केल्या. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आरेमध्ये कारशेड न करण्याचा निर्णय घेतला. कारशेडसाठी कांजूर मार्ग येथील शेकडो एकर जागेचा विचार करण्यात आला. परंतु त्यात केंद्र सरकार व विरोधकांनी खोडा घातला.

आरे येथील कारशेडला मुंबईकरांचा विरोध होणार हे माहीत असतानाही कारशेडसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले व मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तलही करण्यात आली. विकास कामाला आमचा विरोध नाही, मुंबई मेट्रो प्रकल्पालाही विरोध नाही. मुंबईतील दळणवळणाचा विचार करून मेट्रो प्रकल्प करण्याचा निर्णय सर्वात प्रथम काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाच घेतला होता. काँग्रेस पक्ष विकासाच्या आड येणारा किंवा विरोधाला विरोध करणारा नाही. विकास झाला पाहिजे पण पर्यावरणाचा ऱ्हास करून जनतेच्या मुळावर येणारा नसावा अशी आमची भूमिका आहे. आरे मध्येच कारशेड करण्याचा आग्रह होत असेल तर तो कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी होत आहे हे जनतेला समजले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *