Breaking News

संजय राऊत म्हणाले, भाजपा त्यांचे काम “नवहिंदू ओवेसी”मार्फत करून घेतेय राज्यातील हिदूत्ववादी राजकारणावरून राऊतांची खोचक टीका

मागील काही दिवसांपासून राज्यात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपाकडून एकाबाजूला रान उठविण्याचे काम सुरु असतानाच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक घेतलेल्या भूमिकेची जोड मिळाली. त्यामुळे राज्यात हिंदूत्वावरून राजकिय वातावरण तापायला सुरु झाले आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली आहे.

भाजपा त्यांचं काम हे ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ आणि ‘नवहिंदू ओवेसींच्या’ माध्यमातून करुन घेत असल्याची खोचक टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी केली.

मी कोणालाही व्यक्तिगत नाव घेऊन बोललेलो नाही. मी इतकच म्हणालो की, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने ज्या प्रकारे असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या एमआयएमचा वापर केला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात नवहिंदुत्ववादी जे ओवेसी आहेत. हिंदू समाजात देखील काही ओवेसी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, महाराष्ट्रात फूट पाडण्याचं, दंगली घडवण्याचं, धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहे. महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरुक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढच मी सांगेन असे सांगत गंभीर इशारा दिला.

देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडलं ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. परंतु यशस्वी होणार नाहीत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना अयोध्येच्या राम मंदिराच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर काम करत होती. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख साधारण तिकडची परिस्थिती काय हे पाहून आम्ही ठरवू. आमची काय राजकीय यात्रा नाही, आमची ही श्रद्धेची यात्रा आहे. राजकीय यात्रा असेल तर आम्ही तारीख ठरवतो आणि जाहीर करतो असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना लगावला.

आमच्या मनात असं आलं की कोविड काळामुळे वर्षभरात आम्ही अयोध्येला जाऊ शकलो नाही. तेव्हा आदित्य ठाकरे आणि आमचे सगळे शिवसैनिक यांची इच्छा आहे, वर्षभरापासून आमची ही योजना सुरू आहे. परंतु कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही. काही बंधनं आमच्यावरती होती. काल, परवा आम्ही नाशिकला होतो आणि तिथले सगळे पदाधिकारी… कारण, रामनवमी आणि हनुमान जयंती ही नाशिकात मोठ्याप्रमाणावर साजरी होते. ती सुद्धा एक अयोध्येप्रमाणे रामाची भूमी आहे. तेव्हा असं ठरलं की नाशिकच्या शिवसेनेने पुढाकार घ्यावा आणि आयोजन करावं, त्यानुसार त्यावर काम सुरू  असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपा त्यांचं काम हे ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ आणि ‘नवहिंदू ओवेसींच्या’ माध्यमातून करुन घेत आहे. भोंगे वाटप करुन मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी यासाठी कंत्राट दिलं आहे. ते मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवतील. मग खरे ओवेसी (असदुद्दीन ओवेसी) या प्रकरणामध्ये (भोंगा प्रकरणात) पडतील आणि साऱ्याचं रुपांतर दंगलींमध्ये होईल असे भाकितही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती …

Leave a Reply

Your email address will not be published.