Breaking News

शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, मी दिलेला शब्द पाळला राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर पवारांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी

राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला असून मी दिलेला शब्द पाळला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

विधानपरिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्ती संदर्भातील त्या १२ जणांच्या यादीतून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याऐवजी दुसऱ्या नावाचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले. त्यावरून शेट्टी यांनी आपण आता करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे इशारा देत शरद पवारांनी आपल्याला शब्द दिल्याची आठवण महाविकास आघाडीला करून दिली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार वरील भूमिका मांडली.

या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केल्याचे सांगत राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर ईडीकडून राज्यातील राजकिय नेत्यांवर टाकण्यात येत असलेल्या धाडीबद्दल बोलताना ते म्हणाले की, ईडी ही यंत्रणा अशाप्रकारे कधीच या देशात वापरली गेलेली नव्हती. परंतु हल्लीच्या सरकारने या यंत्रणेचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी करण्याची भूमिका घेतल्याची दिसते. त्यामुळे हे फक्त महाराष्ट्रातच नाही. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्ये होतंय. आपल्याला महाराष्ट्रातील माहीत असलेल्या लोकांची आपण चर्चा करतोय, पण हा गैरवापर महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, अन्य राज्यात देखील आहे.

केंद्र सरकराने राज्य सरकारला तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मार्गदर्शन तत्व दिलेली आहेत. त्यामध्ये आणखी काही दिवस थोडी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार विशेषत: मुख्यमंत्री कटाक्षाने आवाहन करत आहेत. आता अन्य घटकांची त्याबद्दलची काही विविध मते असतील, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार असून केंद्र सरकार ज्यावेळी अशी भूमिका घेते. त्यावेळी कमीत कमी त्या केंद्र सरकारच्या विचाराचे जे राज्यात लोक आहेत, त्यांनी तरी तारतम्य ठेवायची आवश्यकता असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी भाजपा नेत्यांना लगावला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *