Breaking News

अतुल भातखळकर बेफाम खोटे बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी कोरोना नसतानाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र उद्योगस्नेही मानकात अधोगती-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही ( Ease of Doing business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद व वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर २०१८ साली १३ व्या स्थानावर होता. कोरोना नसताना ही अधोगती होती हे विशेष. खोटं बोल पण रेटून बोल यात भाजपा तरबेज असून भातखळकर हे रा. स्व. संघाकडून दिक्षा घेऊन बेफाम खोटं बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी असल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

ऑगस्ट महिन्यात जुलैपेक्षा जीएसटी उत्पन्नात ३,७२८ कोटी रुपयांनी घट झाली आहे असे दुसरे धादांत खोटे वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले. प्रत्य़क्षात एप्रिलमध्ये राज्याचा जीएसटी १२,३५० कोटी रुपये, मे महिन्यात ७,९८३ कोटी रुपये, जूनमध्ये ८,३४९ कोटी रुपये, जुलैमध्ये ११,३८८ कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये १२,६४४ कोटी रुपये असून या कालावधीत एकूण ५२,७१४ कोटी रुपये उत्पन्न झालेले आहे.  जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात जीएसटी उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे भातखळकर खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले. लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत जितके जीएसटी उत्पन्न मिळाले होते त्यात या वर्षी ६७.२९ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत असतात. हे सरकार सत्तेवर आल्यापासून कोरोनासह नैसर्गिक संकटांचा सामना सातत्याने करत असतानाही राज्याच्या विकासाची गती थांबू दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारवर जनतेसह उद्योग क्षेत्राचाही विश्वास आहे. खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाजपा नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

उध्दव ठाकरेंचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, त्या स्थगितीमुळे १० हजार कोटी वाढले मुंबई मेट्रो मार्गिका-३ च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गासाठी आरे येथे कारशेड उभे करण्याच्या कामास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published.