Breaking News

शरद पवार यांचे प्रत्युत्तर, चौकशी करता येईल तेवढ्या लवकर करा… आरोप वास्तव आणि सत्याला धरुन नसतील तर आरोप करणाऱ्यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्य सरकारने जाहीर करावे

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. अतुल भातखळकर यांनी केलेल्या या आरोपाच्या अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भातखळकर अभ्यासू व्यक्तीमत्व असल्याचे सांगत राज्य सरकार चौकशी करेल असे जाहिर केले. अतुल भातखळकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट राज्य सरकारलाच आव्हान देत जेवढ्या लवकर चौकशी करता येईल तेवढ्या लवकर करा असे सांगत पत्राचाळ प्रकरणातील तत्कालीन प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी तयार केलेले मिनिट्सच समोर ठेवले. त्यामुळे शरद पवार यांच्या आव्हानावर राज्य सरकार आणि भाजपा काय भूमिका घेणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, पत्राचाळ प्रकरणात माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. चार – आठ – दहा दिवसात म्हणजे जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा, मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणाऱ्यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्य सरकारने जाहीर करावे असे आव्हान दिले.

ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळचे इतिवृत्त ज्या अधिकाऱ्याने सही केली ते माध्यमांना देत असून त्यानंतर जे कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे, त्याच्यात माझे नाव आहे असे माध्यमातून बोलले जात आहे. त्या आरोपपत्रात नक्की काय आहे ते त्यांच्या पान नंबर सातवर आणि आठवर असेल त्याची कॉपी तुम्हाला दिली आहे. म्हणजे जी चौकशी करणारी एजन्सी आहे ती कोर्टात काय मांडते आणि राज्य सरकारची त्यावेळी जी चर्चा झाली त्याची टिप्पणी ते काय म्हणतात त्या दोन्ही कॉपी याची स्वच्छ भूमिका सांगितली आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पत्राचाळ प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त गृहनिर्माणचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या सहीचे पत्रासहीत माध्यमांसमोर ठेवले. बैठका घेऊन मध्यममार्ग काढणं, संवाद साधणं चुकीचं आहे का असा सवाल करतानाच वेगवेगळ्या बैठकांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

याप्रकरणी चौकशी करा आमचा विरोध नाही मात्र पराचा कावळा करु नका. मी १९९० पासून आजपर्यंतचा साक्षीदार आहे. आपण हत्तीच्या मर्मस्थळावर घाव घातल्यावर हत्ती उसळतो असं समाजाचं मत आहे. महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवार आहेत, हे लक्षात ठेवा असे जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावून सांगितले.

जी कागदपत्रे सादर केली त्यात चौकशी करणाऱ्या एजन्सीने काय म्हटले आहे त्याचे वाचन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. पवारसाहेबांना बदनाम करण्याचा डाव आहे. आम्ही बेछूट आरोप करत नाही. जी पक्षाची आणि पवारांची भूमिका आहे ती देशाला आणि राज्याला माहित आहे. तुम्ही आरोप केलाय ना भाजपाचे अध्यक्षही काहीतरी म्हणाले आहेत. ताबडतोब चौकशी करा. अहवाल घ्या आणि हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर संबंधितावर काय कारवाई करणार हे जाहीर करा अशी मागणीही आव्हाड यांनी यावेळी केली.

ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच नंबर वन

महाराष्ट्रातील काही जिल्हयात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला २७७ जागा मिळाल्या असून भाजपा – शिंदे गटाला २१० जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ६०८ जागांपैकी १७३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर आहे तर भाजपा – १६८, कॉंग्रेस – ८४, शिंदे गट – ४२ आणि शिवसेना यांची अधिकृत आकडेवारी आलेली नाही अशी माहिती देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

आम्हाला माहीत असलेल्या आमच्या जागा आम्ही सांगितल्या आहेत आता त्यांना वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत, तर त्या आनंदात त्यांनी रहावं आम्हाला त्याची चिंता नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कोरोना काळातील मुलांबाबतची ती योजना पुन्हा सुरु करा

राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यात काही प्रश्नांवर लोकांमध्ये अस्वस्थता आहे. राज्य सरकारने जे काही निर्णय बदलले आहेत हे कारण आहे. कोरोना काळामध्ये काही मुलं किंवा पालक मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. त्यामध्ये अडीच हजार इतके अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ते अनुदान आताच्या सरकारने स्थगित केले आहे ही माहिती खरी असेल तर राज्य सरकारने लवकरच हा निर्णय लागू करुन अनुदान दिले पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली. यावेळी शरद पवार यांनी कोरोना काळात जे नियम लावण्यात आले होते यामध्ये आई किंवा वडील यांच्यापैकी एकच हयात आहेत अशी जी मुलं आहेत जी कोरोना काळात मृत्यूमुखी पडली, त्यांची संख्या २० हजार आहे आणि ज्यांचे आई- वडील मृत्यूमुखी पडले अशा मुलांची संख्या ८०० आहे. या सर्व पालकांकडे किंवा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचा व समंजसपणाचा सरकारचा हवा. आज अशाप्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या बाहेर झाली त्या – त्या राज्यसरकारने अनुदान दिले आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेश – ४ हजार, कर्नाटक – ३५००, उत्तराखंड – ३५००, मध्यप्रदेश – ५ हजार, दिल्ली – २५००, हिमाचल प्रदेश – २५००, तामिळनाडू – ३ हजार, राजस्थान – २ हजार, महाराष्ट्र १ हजार १२५ होते त्यामध्ये माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाढ करत ते अनुदान अडीच हजार रुपये केले होते. मात्र ही योजना व याला तोंड देणे या सरकारच्या कृतीमध्ये आले नाही. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अशा अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील कुटुंबाची अवस्था गंभीर आहे याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

गुंतवणूकीचे क्लायमेंट तयार करावे- राज्य सरकारला सल्ला

फॉक्सकॉनबाबत मला वेगळं मत मांडायचं नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता त्यासाठी जागाही ठरली होती. एका नव्या प्रकल्पाला संधी मिळाली असती त्यामुळे हा प्रकल्प इथे होणे गरजेचे होते मात्र नाही झाला. तो गुजरातला गेला आता हा प्रकल्प देशात कुठेतरी होतोय म्हणून मी विरोधाला विरोधी भूमिका घेणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यसरकारने गुंतवणूकीचे वातावरण तयार केले पाहिजे. राज्यात काम करत असताना त्यावेळी दोन तास गुंतवणूक करायला येणाऱ्या लोकांना एक विश्वास द्यायला लागायचा. त्यावेळी गुंतवणूक क्लायमेंट महाराष्ट्रात चांगले होते. त्याला धक्का बसला असेल, परंतु इथे राजकीय भूमिका न घेता सगळ्यांनी राज्याच्या हिताच्या गुंतवणूकीचे वातावरण तयार करायला हातभार लावावा असा सल्लाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *