Breaking News

अजित पवारांच्या मागणीवर चंद्रकांत पाटील यांचा टोला ... मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या

मराठी ई-बातम्या टीम

एक राष्ट्र एक कर या घोषणेप्रमाणे संपूर्ण देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. सुरुवातीची पाच वर्षे जीएसटी करप्रणालीमुळे येणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारकडून भरपाईची रक्कम देण्यात येणार होती. परंतु त्यातील दोन वर्षे कोरोनात गेल्याने हा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढविण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मग राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या असा उपरोधिक टोला अजित पवार यांना लगावला.

जीएसटीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. प्रत्येक जबाबदारी केंद्रानेच पार पाडायची असेल तर राज्य सरकार चालविण्याचीही जबाबदारी केंद्र सरकारकडेच द्या, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.

भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यात कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या वेगळ्या हेल्पलाईनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि आ. माधुरी मिसाळ उपस्थित होते.

पाच वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला त्यावेळी कर संकलनात तूट आली तर ती भरून देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाच वर्षांसाठी दिले होते. कोरोनाच्या काळात कर संकलन कमालीचे घटले तरीही केंद्र सरकारने वचन पाळले आहे. जीएसटी कौन्सिलला मदत करून राज्यांना भरपाई देण्यात येत आहे. आता जूनमध्ये पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही केंद्राने राज्याला निधी देत रहावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने पीपीई किट, मास्क, व्हॅक्सिन अशा सर्व गोष्टी केंद्रानेच द्याव्यात अशी मागणी केली. जीएसटी संकलनातील राज्याचा वाटा दररोज आपोआप मिळत असतानाही केंद्राने पुढेही जबाबदारी घ्यावी अशी या सरकारची अपेक्षा आहे. पेट्रोल डिझेलवरील कर केंद्राने कमी केला तरी राज्य सरकार तो कमी करत नाही. प्रत्येक जबाबदारी केंद्र सरकारनेच पार पाडायची असेल तर महाविकास आघाडी सरकारचे नेते फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहेत काय ? मग राज्य चालवायची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत असे भाजपाचेही मत आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकार सभागृहाच्या कालमर्यादेबाबत घटनात्मक तरतुदींकडे दुर्लक्ष करून काम करत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत ठोस काहीही न करता या सरकारकडून फसवणूक चालू आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावर ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

भाजपा बूथपातळीपासून पक्ष बळकट करत असून भाजपाच्या विरोधात तीन पक्ष वेगळे लढले किंवा एकत्र लढले तरीही निवडणुकीत भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. नगरपंचायत निवडणुकीत पहिला क्रमांक मिळवून भाजपाने ताकद दाखवून दिल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत करत उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *