Breaking News

राज्यपालांच्या “त्या” विधानावर अखेर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपतींची तुलना नितीन गडकरी यांच्याशी करत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श असे वक्तव्य करत शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यावरून राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून राज्यपालांच्या विरूध्द तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असलेल्या गडकरींच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ क्लीप शेअर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (१९ नोव्हेंबर) मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून राज्यपालांच्या या विधानावर आक्षेप घेतला जात आहे.

या प्रकरणी ऑफिस ऑफ नितीन गडकरी म्हणजेच गडकरींच्या कार्यालयीन ट्विटर हॅण्डलवरुन एक ३० सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी अगदी भावनिक स्वरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे,” असं गडकरी या व्हिडीओमध्ये महाराजांबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हणतात.

पुढे बोलताना शिवरायांचं गुणगाण गडकरींनी गायलं आहे. “यशवंत! किर्तीवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !!,” असं गडकरी अगदी हातवारे करुन म्हणतात. तसेच हसून त्यांनी, डीएड-बीएड करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता, असंही नितीन गडकरी यांनी महाराजांबद्दल म्हटले. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *