Breaking News

नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका, ‘मोले घातले रडाया…’ ओळीतून फटकारत महाफडतूस माणूस तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे

अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मधु चव्हाण, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते अजीत चव्हाण, राम कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले की, नेमके फडतूस कोण हे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पाहिले आहे. कार्यतत्पर ,धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र याखेरीज दुसरी ओळखच नसलेल्या कर्तृत्वशून्य उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोभनीय भाषेत टीका करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल असूया असल्यानेच उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करत आहेत. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. २०१९ मध्ये भाजपाच्या आधारावर ज्यांचे आमदार निवडून आले त्याच भाजपाला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादाला सोडचिट्ठी दिली. मुख्यमंत्री असताना राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिले, देशद्रोही शक्तींशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना पाठीशी घातले , असेही राणे म्हणाले.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, काही राज्यांमध्ये अशी पद्धत आहे की घरात माणूस गेला की रडायला माणसं बोलवतात. रूदाली असं त्यांना संबोधलं जातं. त्यांना कशाचंही सोयर-सुतक नसतं. पैसे मिळाले की ते रडतात. उद्धव ठाकरे हा तसलाच माणूस आहे. कुणाचंही काही झालं की तिथे पळायचं, पत्नीला आणि मुलाला घेऊन आणि लागतो रडायला. आज एक संत तुकारामांच्या गाथेतली ओळ तुम्हाला वाचून दाखवतो, ‘मोले घातले रडाया । नाही असूं आणि माया ।।’ याचा अर्थ असा आहे की अडीच वर्षात भरपूर मोल कमावलं आहे आता रडायचं काम बाकी आहे. त्या आसवांमध्ये मायाही नाही प्रेमही नाही, असा हा उद्धव ठाकरे आहे अशी टीका केली.
संत तुकारामांना माहिती होतं का माहित नाही की मी लिहितोय असा माणूस जन्माला येईल आणि या ओळी त्याला चपखल बसतील. आता उद्धव ठाकरेचं भवितव्य काहीही नाही. या राज्यात तरी नाही. तू मुख्यमंत्री होतास ना? तेव्हा मुळापासून गुंडगिरी का उखडून टाकली नाही? होते शिवसैनिक एकनाथ शिंदे होते, नारायण राणे होते, पण ते तुला भारी पडले ना? आमचे देवेंद्र फडणवीस सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत. मातोश्री क्रमांक एक आणि दोन हे १०० टक्के अधिकृत आहे का? त्यातला बेकायदेशीर भाग किती आहे? असाही प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘फडतूस’ असा उल्लेख केला असताना त्यावर आक्षेप घेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना ‘महाफडतूस’ म्हणत टीका केली. तसेच, २०१९ साली मीच देवेंद्र फडणवीसांना युती न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.

पाच वर्षं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेता होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजपानं २०१४ साली जर उद्धव ठाकरेंना आधार दिला नसता, युती झाली नसती तर त्यांचे आमदार काही निवडून आले नसते. ते सत्तेत आले नसते. २०१९लाही मी देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो की युती करू नका. सगळं संपलंय त्यांचं. काही कामाचं नाही, असं नारायण राणे म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *