Breaking News

नाना पटोले यांचा गंभीर इशारा, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास…राजासारखे…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहिद होत आहेत म्हणून मतदान करायचे का? असा सवाल विचारात मोदींना मतदान मागण्याचा काही अधिकार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ‘वन नेशन, नो इलेक्शन’ करुन राजासारखे वागतील आणि जनतेला गुलाम बनवतील, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ब्रम्ही, सावरला, भुयार, वलनी, मांगली, आसगाव, कोंडा, चिंचाळ गावांना भेटी दिल्या व जनतेशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी भरघोस आश्वासने दिली होती, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतीचे उत्पन्न दुप्पट करणार, महागाई कमी करणार परंतु यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी नोकऱ्या तर दिल्या नाहीतच पण ज्या नोकऱ्या होत्या त्याही गमवाव्या लागल्या. राज्यातील तरुण शिक्षित मुले विविध स्पर्धा परीक्षा देतात पण पेपर फुटण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांचे स्वप्न भंग होत आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास केंद्र सरकारची ३० लाख सरकारी पदे भरणार, पेपरफुटीला लगाम घालणारा कायदा केला जाईल, पदवीधर किंवा डिप्लोमा धारकाला प्रशिक्षण देऊन वर्षाला १ लाख रुपये विद्यावेतन देणार, गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार तर शेतमालाला एमएसपीचा कायदा, कर्जमाफी आणि शेती जीएसटीमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. जातनिहाय जनगणना करणार तसेच आदिवासींना जल, जंगल, जमीनचा अधिकार देणार.

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते वन नेशन, नो इलेक्शन करुन राजासारखे वागतील व जनतेला गुलामासारखे वागवतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानही संपवू असे भाजपचे नेते रोज म्हणत आहेत. लोकसभेची यावेळची निवडणूक ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून मोदींच्या तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करा आणि काँग्रेस, इंडिया आघाडीला विजयी करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *