Breaking News

एकनाथ शिंदे बंड; २ रा अंक संपण्याच्या आधीच ३ रा सुरु फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपाल कोश्यारी यांचे बहुमत सिध्द करण्याचे आदेश

राज्यातील महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. या बंडात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजाविल्यानंतर त्याविरोधात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने एकप्रकारे स्थगिती मिळविली. मात्र या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिल्याने शिंदे गटाच्या या बंडखोरीचा दुसरा अंक संपण्याआधीच तिसरा अंक सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर १६ आमदारांना खुलासा देण्यासाठी सोमवार संध्याकाळ पर्यंतची असलेली मुदत १२ जुलैपर्यंतची वाढवून दिली. तसेच शिवसेनेचा नेमका गटनेता कोण आणि प्रतोद कोण याप्रश्नी निर्णय न देता त्यासंदर्भात पाच दिवसात शपथ पत्र सादर करण्याचे आदेश केंद्र सरकार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शिवसेनेचे अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांना सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्या १६ आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार काहीशी दुरावली गेली. यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी पुढील निर्णय घेतल्यानंतर या बंड नाट्यातील तिसऱ्या अंकातील सुरुवात होईल असे वाटत असतानाच तिसऱ्या अंकाला सुरुवात झाली. काल रात्री दिल्लीहून देवेंद्र फडणवीस परतल्यानंतर त्यांनी भाजपाच्या निवडक नेत्यांना सोबत घेवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने राज्य सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगावे अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांना दिले. त्यानंतर लगेचच यासंदर्भातील पत्र तयार करून आज सकाळी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पाठविले. विशेष म्हणजे राज्यपाल कोश्यारी यांनीही महाविकास आघाडीला उद्याच अर्थात २४ तासाच आपले बहुमत सिध्द करण्याची वेळ दिली आहे.

बहुमत दिवसभरात सिध्द करण्यासाठी ३० जून रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याचे आदेश विधिमंडळाला देत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच विधानसभा बरखास्त करण्याचे आदेशही विधानसभा उपाध्यक्षांना दिले. विशेष म्हणजे बहुमत सिध्द करण्यासाठी मतदान गुप्त पध्दतीने किंवा आवाजी मतदानाने न घेता शिरगणती करून मतांची नोंद करावी असे आदेशही राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे दिले.

त्याचबरोबर बहुमताचे पूर्ण चित्रिकरण करण्यात यावे आणि त्याचे लाईव्ह प्रक्षेपणही करावे अशी सूचनाही विधानसभेला दिली. त्यामुळे उद्या सकाळपासूनच विधानसभेतील प्रत्येक कामकाजाचे थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पहायला मिळणार आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार टिकणार की जाणार यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या या तिसऱ्या अंकात नेमके काय घडणार याचा उलघडा उद्याच होणार आहे.

बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिलेले राज्यपाल कोश्यारी यांचे हेच ते पत्र

Check Also

निवडणूक जाहिरातीद्वारे भाजपा-शिंदे-पवार गटाने पुन्हा दाखवून दिली बौध्दीक दिवाळखोरी

पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे, याची जाणिव झाल्याने भाजपा आणि पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *